Sammed ShiKharji : जैन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारकडून सम्मेद शिखरजी या तीर्थस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यापासून समाज बांधवांनी देशव्यापी (Jain community protests against Jharkhand government) एल्गार सुरु केला आहे. मोर्चे, आंदोलन  आदी माध्यमातून जैन समाजाने झारखंड सरकारच्या निर्णयाला विरोध करत सम्मेद शिखरजी तीर्थस्थळ राहू देण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील जैन बांधव आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात एकवटले. दसरा चौक ते जिल्हाधिकारी असा भव्य मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जोपर्यंत निर्णय रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन करणार असल्याची भूमिका समाजाने घेतली आहे. 


दिल्लीपासून  ते पार कोल्हापूरपर्यंत मोर्चे, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सम्मेद शिखरजी आहे तरी काय? आणि जैन धर्मियांसाठी ते इतकं पवित्र का आहे? (What is Sammed ShiKharji) याबाबत जाणून घेऊया.  झारखंडमधील हेमंत सरकारने गिरडीह जिल्ह्यातील श्री समेद शिखरजी हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. त्याविरोधात जैन धर्माचे लोक रस्त्यावर उतरले आहेत. श्री सम्मेद शिखर हे तीर्थक्षेत्र असल्याने सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, त्याला पर्यटन स्थळ घोषित करू नये, असे जैन समाजातील लोकांचे म्हणणे आहे.


Sammed ShiKharji : 20 तीर्थंकरांना मोक्ष प्राप्त झाला


श्री सम्मेद शिखरजी (history of Sammed ShiKharji)  झारखंडमधील गिरडीह जिल्ह्यातील मधुबन भागात आहे. याला पारसनाथ पर्वत असेही म्हणतात. जैन धर्मात या पर्वताला विशेष महत्त्व आहे. जैन धर्माच्या अनुयायांच्या मते, येथे सुमारे 20 तीर्थंकरांना मोक्ष प्राप्त झाला. म्हणूनच श्री समेद शिखरजी जैन समाजाला अत्यंत पूजनीय आहे. समेद शिखरजी सुमारे 9 किलोमीटर परिसरात पसरलेले आहे.


पर्यटनस्थळ घोषित केल्याने सरकारचा कडाडून विरोध 


जैन धर्मशास्त्रातील श्री सम्मेद शिखराबाबतच्या मान्यतेनुसार, येथे एकदा तीर्थयात्रा केल्यावर मनुष्याला पशुयोनी आणि मृत्यूनंतर नरक मिळत नाही, असे म्हटले जाते. राज्य सरकारच्या निर्णयाबाबत जैन समाजातील लोकांचे म्हणणे आहे की, श्री सम्मेद शिखर हे तीर्थक्षेत्र आहे. ते पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करू नये. हे श्रद्धेचे क्षेत्र आहे. पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्यास लोक येथे फिरतील. अन्न, दारू इत्यादी निषिद्ध गोष्टींचा वापर होईल. ज्यामुळे या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य भंग होईल.


सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ करू नका, राज्यपालांकडून आवाहन 


दुसरीकडे, झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून जैन धर्माचे पवित्र स्थान असलेल्या सम्मेद शिखरजीला तीर्थक्षेत्र दर्जा राहावे यासाठी, अशी मागणी केली आहे. ते पत्रात म्हणतात, सम्मेद शिखरजी जैन समाजाच्या भावनांशी निगडित असल्याने या विषयाचा फेरविचार व्हायला हवा. पर्यावरण मंत्रालयाने हे वन्यजीव अभयारण्य घोषित करून ते इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये ठेवले आहे. त्याचवेळी झारखंड सरकारने (सोरेन सरकार) याला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.


गेल्या काही दिवसांपासून या भागात मांसाहार आणि दारूचे सेवन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जैन धर्मियांचे हे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे. पर्यटनस्थळ म्हणून घोषित केल्याने या परिसराचे पावित्र्य धोक्यात येईल, असे जैन धर्मीयांचे मत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या