Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) भुदरगड तालुक्यातील व्हनगुत्तीमधील तरुण दाम्पत्याने फसवणूक झाल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोन व्यक्तींकडून त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याने या दाम्पत्याने टोकाचा निर्णय घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. राहुल राजाराम परीट (वय 23) व त्यांची पत्नी अनुष्का (वय 21) अशी त्यांची नावे आहेत. इस्पूर्ली (ता. करवीर) येथे गुरुवारी ही घटना उघडकीस आली. या घटनेची नोंद इस्पूर्ली पोलिसांमध्ये झाली आहे. इस्पुर्लीत एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
वडिलांपेक्षा महत्त्वाचं कोणी नाही आणि आईपेक्षा मोठं कोणी नाही
राहुलचा सात-आठ महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपली फसवणूक झाल्याची चिठ्ठी कुटुंबीय व इतरांना पाठविली होती. राहुलने सोशल मीडिया स्टेटसवर वडिलांपेक्षा महत्त्वाचं कोणी नाही आणि आईपेक्षा मोठ कोणी नाही. ‘लव्ह यू सो मच मम्मी अँड पप्पा. आय एम सो सॉरी’ असा मेसेज टाकून आई-वडिलांची माफी मागितली आहे.
दोघांकडून फसवणूक झाल्याने टोकाचा निर्णय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलने आत्महत्या करण्यापूर्वी मित्रांना व्हॉटस्ॲपवर मेसेज केला होता. राहुल परीट महावितरणमध्ये काम करत होता. त्याची नियुक्ती कागल तालुक्यातील एका गावात होती. त्याने तेथील 109 ग्राहकांची वीज बिल भरणा रक्कम सुमारे एक लाख 45 हजार 760 जमा केली होती. ही रक्कम भरण्यासाठी एका सहकाऱ्याकडे दिली होती. त्याने ती रक्कम न भरता वडिलांच्या उपचारासाठी वापरली. दरम्यान, त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याने याबाबत कोणालाही माहिती देऊ नको, मी तुला पैसे परत करतो, असे सांगितले होते.
सतत पैसे मागितल्यानंतर यातील फक्त तीस हजार रुपये इतकीच रक्कम परत केली होती. कागल तालुक्यातील दुसऱ्या एका व्यक्तीने कर्ज मिळवून देतो, म्हणून माझ्याकडून एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम घेतली. यानंतर कर्ज प्रकरणाबाबत त्याच्याकडे सतत पाठपुरावा केला असता त्याने परत न करता फसवणूक केली. दिलेली रक्कम परत मागितली असता केवळ दोन टप्प्यात दहा हजार रुपये ऑनलाईन दिले. मात्र, उर्वरित रक्कम दिली नाही. या दोन व्यक्तींच्या वागण्याला कंटाळून हा निर्णय घेतला आहे. वीज बिल रक्कम स्वतः भरण्याइतकी माझी परिस्थिती नाही. माझी पोलिसांना विनंती आहे की, या दोघांकडील माझी रक्कम आई-वडिलांना मिळवून द्यावी.
इतर महत्वाच्या बातम्या