Kolhapur Rains : कोल्हापूर जिल्ह्यातून एक विचित्र बातमी समोर आली आहे. वारणा नदीच्या (Warna River) अडकलेल्या एका व्यक्तीची कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थपनाच्या पथकाने सुखरुप सुटका केली आहे. हा इसम जवळपास 12 ते 13 तास झाडावर अडकून होता. जयवंत खामकर असं या इसमाचं नाव आहे. आत्महत्या (Suicide) करण्याच्या उद्देशाने या इसमाने वारणा नदीत उडी मारल्याची प्राथमिक माहिती होती. परंतु तोल गेल्याने पाण्यात पडल्याचं जयवंत खामकर यांनी बाहेर आल्यानंतर सांगितलं.


नेमकं काय घडलं?


कोल्हापूर जिल्ह्याला काल रेड अलर्ट असल्याने मुसळधार पाऊस होता. नदी नाले ओसंडून वाहत होते. वारणा नदी देखील दुथडी भरुन वाहत होती. नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगाने सुरु होता. अशातच जयवंत खामकर हे काल (27 जुलै) रात्री नऊच्या सुमारास वारणा नदीच्या पात्रात पडले. पाण्याच्या जोरदार प्रवाहात ते वाहून गेले. सुदैवाने ते नदीपात्रातील एका झाडाला अडकले. रात्रभर ते झाडावर चढून होते. पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. आज सकाळी इथून नदीजवळून जाणाऱ्या नागरिकांना ते दिसले. जयवंत खामकर यांनी हात दाखवून, हाक मारुन वाचवण्यासाठी मदत मागितली. यानंतर पोलीस तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम इथे दाखल झाली. नागरिकांचीही मोठी गर्दी नदीजवळ झाली होती. त्यांचे कुटुंबीय देखील इथे हजर होते. जयवंत खामकर पाण्यात कसे पडले याची कल्पना त्यांना देखील नव्हती.


12 ते 13 तास झाडावर अडकून


अखेर आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यपस्थापनाच्या पथकाने नदीपात्रात जाऊन झाडावर अडकलेल्या जयवंत खामकर यांची सकाळी साडेदहाच्या सुमारास सुटका केली. जयवंत खामकर जवळपास 12 ते 13 तास झाडावर अडकून होते. सध्या ते सुखरुप आणि सुरक्षित आहेत. 


तोल जाऊन पडलो, नदीपात्रातून बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया


दरम्यान जयवंत खामकर यांनी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने नदीपात्रात उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु नदीच्या बाहेर आल्यानंतर खामकर यांनी वेगळीच माहिती दिली. काल रात्री नऊच्या सुमारास पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी मी वारणा नदीच्या पुलावर आलो होतो. दुचाकी बाजूला ठेवून मी पुलावरुन खाली वाकून पाहत होता. पण त्याचवेळी तोल गेला आणि नदीत पडलो, अशी माहिती जयवंत खामकर यांनी यावेळी दिली. 


हेही वाचा


Kolhapur : कोल्हापूरकरांना दिलासा, गेल्या 12 तासांत पंचगंगेची पाणी पातळी केवळ 7 इंचांनी वाढली