Kalammawadi Dam : कोल्हापूर शहराला थेट पाईपने पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आलेल्या काळम्मावाडी धरणात 80 टक्के पाणीसाठा झाला आहे. काळम्मावाडी धरण सांडवा पातळीपर्यंत भरले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या पातळीपर्यंत काळम्मावाडी तीन दिवस आधीच भरले आहे. गळतीमुळे विशेष म्हणजे धरणातील कमी करण्यात आलेला संचय आणि उन्हाळ्यात धरणात तळ गाठल्यान चिंता लागून राहिली होती. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या धुवाँधार पावसाने धरणात पाणीसाठा वेगाने झाला आहे. पाणीसाठा कमी करण्यासाठी पाच वक्राकार दरवाजातून एक हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. पायथ्याच्या वीज गृहात जनित्र संचात तांत्रिक बिघाड झाल्याने विसर्ग सुरू करण्यास अडसर आहे. त्यामुळे वक्राकार दरवाजातून विसर्ग सुरू आहे. वक्राकार दरवाजावरून दूधगंगा नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. 


धरण 20.2 टीएमसी म्हणजेच 79.54 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन संस्थेच्या निकषानुसार सध्याचा पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या गळतीच्या कारणास्तव गेल्या वर्षीपासून पाच टीएमसी कमी पाणी संचय केला जात आहे. यंदाही हीच पाणी पातळी निर्धारित करण्याचे ठरले आहे. गतवर्षी या धरणात पाच टीएमसी पाणी शिल्लक असूनही धरण या पातळीला सात ऑगस्टला भरले होते. यंदा तळ गाठूनही चार ऑगस्टला भरल्याने पावसाचा अंदाज येतो. 


धरण फुटल्यावर काम होणार का?


दरम्यान, काळम्मावाडी धरणाच्या भिंतीतील पाणी गळती काढण्याच्या नावाखाली गेल्यावर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला होता. त्याचा कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला फटका बसला. या धरणाला गळती लागल्यामुळे धरण धोक्यात असून दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्यावा, अशी मागणी आमदार पी.एन. पाटील यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. 


काळम्मावाडी धरणाची पाणी साठवण क्षमता 28 टीएमसी असून या धरणाच्या मुख्य भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. पाटबंधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी प्रतिसेकंद 650 लिटर्स पाणी गळती होते. ही गळती एक वर्षात काढणार असून 84 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आणि निविदा काढणार आहे, असे सांगून काही अधिकाऱ्यांनी तीस टक्के पाणीसाठा कमी केला होता. मात्र, पावसाला उशीर झाल्याने ऐन उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते. जनतेला प्यायलाही पाणी मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. 


या धरणाला धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे धोका असूनही कामच व्हायला तयार नाही. धरण फुटल्यावर काम होणार का? असा संतप्त सवाल पाटील यांनी उपस्थित केला. ज्या ठिकाणी धरण फुटलं आहे तेथील जनतेचे हाल झाले आहेत. धोकादायक असलेल्या काळम्मावाडी धरणाची दुरुस्ती लवकर होणार का? याबाबत शासनाने स्पष्टीकरण द्यावे व तातडीने निधी मंजूर करून निविदा काढावी अशी मागणी पाटील यांनी केली. या मागणीवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.


इतर महत्वाच्या बातम्या