Kolhapur Railway Station: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (6 ऑगस्ट) देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचा ऑनलाईन भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यामध्ये कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी केंद्र सरकारने 43 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.


कोल्हापूर रेल्व स्थानकावर 43 कोटी 3 लाखांच्या निधीतून विकासकामे केली जाणार आहेत. त्यामध्ये स्थानकाचे प्रांगण, तिकीट बुकिंग काउंटर, एटीव्हीएम सुविधा, नव्याने तयार केलेल्या कक्षात विद्यमान बुकिंग काउंटर स्थलांतर, प्रवेश लॉबी, मुख्य प्रवेशद्वार आणि द्वितीय प्रवेशद्वारांवर स्वतंत्र कव्हर पार्किंग, रस्ता रुंदीकरण, लँडस्केपिंग, रस्ता पृष्ठभाग, पादचारी मार्गाचे नूतनीकरण आदी कामांचा समावेश आहे. 


देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी 13 हजार 539 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, त्यातून राज्यातील 123 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत असून या स्थानकांमध्ये मूलभूत पायाभूत तसेच अद्ययावत सुविधा आणि रेल्वे मार्गांची कामे सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


पुनर्विकासामुळे शहरी आणि ग्रामीण भागात आर्थिक संपन्नता निर्माण होईल 


भारतीय रेल्वे हे गरीब आणि श्रीमंत दोन्ही वर्गांना विकास आणि प्रगतीची समान संधी देणारे प्रवासाचे साधन असून रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे शहरी आणि ग्रामीण भागात आर्थिक संपन्नता निर्माण होईल व विकास सर्वसमावेशक होईल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले. 


'अमृत भारत स्थानक योजने’त समाविष्ट महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके 



  • सोलापूर रेल्वे विभाग – अहमदनगर, दौंड, कोपरगाव, कुर्डुवाडी जंक्शन, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, सोलापूर

  • पुणे रेल्वे विभाग - आकुर्डी, कोल्हापूर, तळेगाव

  • भुसावळ रेल्वे विभाग – बडनेरा, मलकापूर, चाळीसगाव, मनमाड, शेगाव 

  • नागपूर रेल्वे विभाग – वडसा, गोंदिया, चांदाफोर्ट, बल्लारशाह, चंद्रपूर, धामणगाव, गोधनी, हिंगणघाट, काटोल, सेवाग्राम, नरखेड, पुलगाव

  • मुंबई रेल्वे विभाग – कांजुरमार्ग, परळ, विक्रोळी

  • नांदेड रेल्वे विभाग – औरंगाबाद, गंगाखेड, हिंगोली डेकन, जालना, किनवट, मुदखेड, नगरसोल, परभणी, परतूर, पूर्णा, सेलू, वाशिम

  • सिकंदराबाद रेल्वे विभाग – परळी वैजनाथ


इतर महत्वाच्या बातम्या