कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीकडून शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज (29 मार्च) भाजप पदाधिकाऱ्यांनी संजय मंडलिक यांच्यासमोर जाहीर नाराजी व्यक्त करत गर्भित इशारा सुद्धा दिला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये हातकणंगलेनंतर कोल्हापुरातही सुद्धा नाराजी असल्याचे स्पष्ट झालं आहे. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी संजय मंडलिक यांच्या यांच्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.


ते म्हणाले की, गेल्यावेळी आम्ही मदत केली. मात्र, पाच वर्षात आमचे फोन देखील उचलले गेले नाहीत. आता तुम्ही जुने मित्र विसरा असा गर्भित इशाराही महेश जाधव यांनी दिला. ते म्हणाले की आम्ही ताकदीने मदत करू, मात्र यापुढे असं चालणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. महेश जाधव यांनी सर्वांसमक्ष सुनावल्यानंतर संजय मंडलिक यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली. 


तर राज्यसभेवरच त्यांची बिनविरोध निवड केली असती 


संजय मंडलिक यांनी यावेळी सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीमधील नेत्यांवर टीका केली. शाहू महाराजांचा सन्मान करायचा असता, तर त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड केली असती. पण त्यांना ते करायचं नव्हतं, महाराजांना उन्हातान्हात फिरवायचं होतं महाराजांना ते त्रास देत आहेत ते मला आवडलेलं नाही, अशी टीका संजय मंडलिक यांनी केली. पक्षाला उमेदवार मिळाला नाही म्हणून महाराजांना साकडे घातले गेले आणि महाराज त्या आग्रहाला बळी पडल्याची टीका सुद्धा संजय मंडलिक यांनी सतेज पाटील यांच्यावर केली. 


इतर महत्वाच्या बातम्या