कोल्हापूर : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यातील सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्याने आनंद व्यक्त केला. या रागातून मुंबईच्या दोन चाहत्यांनी सीएसकेच्या चाहत्यावर जीवघेणा हल्ला केला. हणमंतवाडी (ता. करवीर) येथे बुधवारी (दि. २७) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडलेल्या घटनेत सीएसकेचे चाहते बंडोपंत बापूसो तिबिले (वय ६३, रा. हणमंतवाडी) हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी बळवंत महादेव झांजगे (वय ५०) आणि सागर सदाशिव झांजगे (वय ३५, दोघे रा. हणमंतवाडी) यांना करवीर पोलिसांनी अटक केले.


बुधवारी रात्री बळवंत झांजगे आणि सागर झांजगे हे इतरांसोबत गल्लीतील एका घरात आयपीएलचा सामना पाहत होते. हे दोघेही मुंबई इंडियन्सने चाहते असून, हैदराबाद संघाने धावांचा डोंगर उभा केल्याने ते रागात होते. रोहित शर्मा बाद होताच चेन्नई सुपर किंग्जचे चाहते बंडोपंत तिबिले तिथे पोहोचले. 'रोहित शर्मा गेला. आता मुंबई कशी जिंकणार?' असे म्हणत ते चेन्नई संघाचे कौतुक करू लागले. याचा राग आल्याने बळवंत झांजगे यांनी तिबिले यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली. त्याचवेळी सागर याने डोक्यात फळी घातल्याने तिबिले जागीच बेशुद्ध पडले. खासगी रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


याबाबत जखमी बळवंत तिबिले यांचे भाऊ संजय बापूसो तिबिले (वय ४८) यांनी करवीर पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. क्रिकेटच्या सामन्यादरम्यान किरकोळ कारणावरून दोन संघांच्या चाहत्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेने पोलीसही चक्रावले. पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार अधिक तपास करत आहेत.


क्षणिक राग महागात पडला


क्षणिक राग आणि भावनेच्या आवेगात वाहून गेल्याने क्षुल्लक कारणातून बंडोपंत तिबिले आज मरणाच्या दारात आहेत. इतरवेळी गुण्यागोविंदाने राहणारे सख्खे शेजारी आयपीएलमधील दोन संघाच्या चुरशीने भिडले. यातून घडलेल्या दुर्घटनेमुळे तिघांचे आयुष्य उद्धवस्त  होण्याची वेळ आली आहे. 


देशभरात सध्या आयपीएलचा माहोल आहे. आयपीएलच्या टीम आणि खेळाडूंच्या चाहत्यांसाठी आयपीएल ही पर्वणी असते. सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षात चाहते विभागले जातात. महाराष्ट्रात मुंबई इंडियन्सच्या टीमचे,  रोहित शर्मा आणि चेन्नई सुपर किंग्जचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. मुंबई आणि चेन्नईच्या चाहत्यांमध्ये अनेकदा खुन्नस पाहायला मिळते. हैदराबादमध्ये 27 मार्चला मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात मॅच पार पडली. या मॅचमध्ये मुंबईला 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सची धुलाई करत सनरायजर्स हैदराबादनं 3 विकेटनं 277 धावा केल्या. सनरायजर्सनं ठेवलेल्या 277 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मानं आक्रमक फलंदाजी सुरु केली होती. रोहित शर्मा चांगली सुरुवात केल्यानंतर 26 धावांवर बाद झाला होता.


संबंधित बातम्या :


राजस्थानची ती चाल महत्त्वाची ठरली, आर. अश्विनकडून मोहीम फत्ते, दिल्लीच्या मुख्य बॉलर्सला धुतलं


Rishabh Pant : चांगली सुरुवात करुनही अपयश,रिषभ पंत प्रचंड संतापला, आऊट होताच जे केलं ते धक्कादायक