कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय विद्यापीठ समजले जाणाऱ्या कागल विधानसभेला जोरदार घमासान सुरु आहे. कागलमध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समरजितसिंह घाटगे यांची विधानसभेला लढत निश्चित झाली असली तरी मंडलिक गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे कागलमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून मंडलिक प्रेमी गटाकडून कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामध्ये हसन मुश्रीफ यांच्यासह समरजित घाटगे यांच्यावर सुद्धा टीका करण्यात आली आहे. त्यामुळे मंडलिक गटाच्या नाराजीमुळे मुश्रीफ गट आणि घाटगे गट सावध झाला आहे. मात्र, वीरेंद्र मंडलिक यांनी घेतलेल्या भूमिकेवरून माजी खासदार संजय मंडलिक यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. 


संजय मंडलिक यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पिता पुत्रांमुळे मत मतांतरे असल्याचे समोर येत आहे. माजी खासदार संजय मंडलिक हे हसन मुश्रीफ यांच्या व्यासपीठावर दिसून आले. त्यामुळे दोघांच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. वीरेंद्र मंडलिक यांनी मेळावा घेत कागलमधून निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर प्रस्थापित विरोधाची लाटेचा फटका हसन मुश्रीफ यांना बसू शकतो, असेही म्हटलं होतं. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही नेत्यांकडून संजय मंडलिक यांना अपेक्षित मदत झाली नाही असाही आरोप त्यांच्याकडून करण्यात आला.


मुश्रीफ यांना अत्यंत ताकतीने मदत करा


त्यामुळे वीरेंद्र मंडलिक यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे संजय मंडलिक कोणती भूमिका घेतात? याकडे लक्ष होतं. मात्र आता संजय मुंडलिक यांनी मुश्रीफ यांना अत्यंत ताकतीने मदत करा, असं आवाहन केलं आहे. कागल तालुक्यातील मौजे सांगावमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये संजय मंडलिक यांनी हसन मुश्रीफ यांना मदत करण्याचा आवाहन केलं. त्यामुळे आता या दोघांमध्ये मतांतरे दिसून येत आहे. दुसरीकडे वीरेंद्र मंडलिक यांच्याकडून महायुतीकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह सुरू आहे. त्यामुळे आता या वादामध्ये वीरेंद्र मंडलिक यांची समजूत कोणत्या पद्धतीने काढली जाणार याकडे लक्ष असेल.


यापूर्वीच या मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही घाटगे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.  कागलकरांनी निवडून दिल्यास त्यांना मंत्रीपदाचे सुतोवाचही शरद पवार यांनी कागलमध्ये मेळाव्यामध्ये केले आहेत. त्यामुळे कागलच्या रणांगणामध्ये आता चांगलीच राजकीय हवा भरली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या