कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघावरून कलगीतुरा रंगला असतानाच आता कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा धुसफूस चांगलीच वाढली आहे. या मतदारसंघातून शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. त्यांनी थेट मुश्रीफ तुम्ही थांबा असे म्हणत आव्हान दिलं आहे. वीरेंद्र मंडलिक यांनी मेळाव्यामध्ये मुश्रीफ यांच्यासह समरजितसिंह घाटगे यांच्यावरही टीका केली होती.
गावोगावी कट्टर मंडलिक प्रेमींकडून बॅनरबाजी
दरम्यान, कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये गावोगावी कट्टर मंडलिक प्रेमींकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामध्ये हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही. बॅनरवर कट्टर मंडलिक प्रेमी असाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये समरजित आणि मुश्रीफ यांची लढाई सुरु असतानाच महायुतीमध्ये सुद्धा वादाला तोंड फुटल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले वीरेंद्र मंडलिक?
वीरेंद्र मंडलिक यांनी घेतलेल्या मेळाव्यात मुश्रीफ यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. ते म्हणाले की, कागल विधानसभा मतदारसंघात मुश्रीफ यांना उमेदवारी दिल्यास प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका बसू शकतो. दहापैकी आठ मतदार मुश्रीफसाहेब नको म्हणतात, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर महायुतीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे मुश्रीफसाहेब तुम्ही आता थांबावे. त्यांनी लोकसभेला कागल तालुक्यातील घटलेल्या मतदानाला मुश्रीफांसह समरजित घाटगे यांना जबाबदार धरले.
ते म्हणाले की, कागल ही शिवसेनेची नैसर्गिक जागा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर मी कागल विधानसभा लढविण्यासाठी तयार आहे. समरजित घाटगे यांच्यावरही टीकास्त्र सोडत विरेंद्र मंडलिक म्हणाले, लोकसभेच्या तोंडावर घाटगे यांनी राजे विरुद्ध जनक घराणे म्हणत आपल्याला उमेदवारी मागितली. त्यामुळे पंधरा दिवस वेळ गेला. प्रचारामध्येही राजेंना मदत केली.
तर आमची 80 हजार मते आहेत
दुसरीकडे, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावरून सुरु असलेल्या वादावर धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर भाजपने पहिल्यापासूनच दावा केला आहे. पोटनिवडणुकीत आम्हीही जागा लढवली असून 80 हजार मतदान घेतलं आहे. राजेशो क्षीरसागर यांनी घेतलेला मेळावा कोणावर दबाव टाकण्यासाठी असू नये. ते जर दक्षिणमध्ये आमची 15 हजार मतं आहेत असं म्हणत असतील, तर आमची उत्तरमध्ये 80 हजार मतं आहेत. एकमेकांना सोबत घेऊन गेलो तरच आपण जागा निवडून आणू शकतो, निवडणुकीच्या तोंडावर गैरसमज होणारे मेळावे होऊ नयेत, असा टोलाही महाडिक यांनी क्षीरसागर यांना लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या