Kopeshwar Temple : गेल्यावर्षी राज्य सरकारकडून अर्थसंकल्पामध्ये प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरासाठी 12 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर 1 वर्षांनंतर पुन्हा 100 कोटी देण्याची घोषणा झाली. मात्र, आजपर्यंत सत्ता बदलाच्या सारीपाटामध्ये एक पैसाही अजून वितरित झाला नसल्याने कामाला सुरुवात झालेली नाही. मंदिराच्या जिर्णोद्धाराला निधीचा बूस्टर ढोस मिळणार आहे की नाही? असा सवाल जाणकारांमधून केला जात आहे.
खिद्रापूर कोपेश्वर मंदिर वास्तुशास्त्र व शिल्पकलांचा मनोहर संगम आहे. दीड हजार वर्षांपूर्वीच्या शिल्पकलेची साक्ष देत हे मंदिर आजही उभे आहे. मंदिरातील गाभारा, नंदी असलेला सभामंडप, स्वर्गमंडप, अप्रतिम शिल्प, शिलालेख, दंतकथा, निसर्ग मंदिराची प्राचीनता, कलाकुसर असा प्राचीन संस्कृतीचा एक अनमोल ठेवाच याठिकाणी पाहायला मिळतो.
हे मंदिर पर्यटकांच्या आकर्षणाचे आणखी केंद्रबिंदू ठरण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी सुमारे 12 कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र, सत्ता बदलाच्या सरीपाटात आजपर्यंत निधी मिळाला नाही. त्यामुळे ही घोषणा हवेतच विरते की काय अशी स्थिती झाली आहे. शासकीय स्तरावर याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे मुख्य श्रीमती शिखा जैन, किरण कलमदानी यांनी दुरुस्तीचा आराखडा तयार केला आहे.
खिद्रापूर कोपेश्वर मंदिर या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेटमध्ये घोषणा केली होती. मग याचा निधी कुठे गेला? स्थानिक लोकप्रतिनिधींनी घोषणा करण्यापलीकडे किती प्रयत्न केले? शिरोळ तालुक्यातील शिल्प वैभव टिकवण्याबाबत लोकप्रतिनिधींना गांभीर्य नसल्याची टीका करत मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला धडक देणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले
घोषणा होऊनही कामाला सुरुवात नाही
राज्यमंत्री डॉ.पाटील-यड्रावकर यांनी खिद्रापूर मंदिराची पाहणी करत यापूर्वी 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आणखी अपेक्षित असलेल्या 100 कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देऊन शिल्प वैभवाच्या दुरुस्तीला सुरवात करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
राज्य सरकारने पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाने मंदिर व परिसराचा विकास करण्यासाठी महिन्याभरापूर्वी प्रकल्प अहवाल तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापक संचालक चंद्रकांत पुलकुंडवार यांना आदेश दिले होते.
त्यानुसार तहसीलदार डॉ.अपर्णा धुमाळ-मोरे, महामंडळाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक, उपअभियंता समाधान पाटील, प्रकल्प सल्लागार संचालक सत्यजित चव्हाण आदीच्या प्रमुख उपस्थितीत अहवाल तयार करण्यात येणार होता. त्याचे काय झालं? असा सवाल पर्यटकांतून उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या