Kolhapur Grampanchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामंपचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार हे निश्चित झाले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या राज्यातील 7 हजार 675 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठविले आहे. मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींमध्ये जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.


शासनाने लागू केलेले निर्बंध व सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका यामुळे जानेवारी 2021 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात आल्या आहेत. आता राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये राज्यातील 7,675 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्यांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.


जशा मुदती संपतील तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक


ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना, मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे नियोजन निवडणूक आयोग करत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ग्रामपंचायतींच्या जशा मुदती संपतील तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करावी, असे निवडणूक आयोगाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.


मुदत संपल्यानंतर त्या त्या ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांनाच त्या ठिकाणी प्रशासक म्हणून नेमण्यात येते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत 475 आहेत. यामध्ये ऑक्टोबर महिन्यात 1, नोव्हेंबर महिन्यात 429, तर डिसेंबर महिन्यामध्ये 45 ग्रामपंचायतीचा कालावधी संपणार आहे. 


येत्या तीन महिन्यात मुदत संपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती 



  • करवीर 53

  • कागल 26 

  • पन्हाळा 50

  • शाहूवाडी  49

  • हातकणंगले 39 

  • शिरोळ 17

  • राधानगरी 66

  • गगनबावडा 21 

  • गडहिंग्लजड 34 

  • आजरा 36 

  • भुदरगड 44

  • चंदगड 40


इतर महत्वाच्या बातम्या