कोल्हापूर : कोल्हापूर शहरात (Kolhapur News) कोल्हापूर शहरात कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. रुग्ण सापडल्यानंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडताना मास्क वापरण्याचं महापालिकेचे नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाण टाळावं तसेच पन्नास वर्षावरील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागानं आवाहन केलं आहे. दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित रुग्ण हा काल (20 डिसेंबर) कोल्हापूर शहरात दाखल झाला होता. त्याने कोठून कुठवर प्रवास केला याबाबत माहिती मिळालेली नाही. दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्गमध्येही कोरोना रुग्ण आढळून आला होता. 


आरोग्यमंत्री घेणार राज्याचा आढावा


दुसरीकडे, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत कोरोना विषाणूचा नवीन जे एन 1 व्हेरियंट उपाय योजनांचा राज्यस्तरीय आढावा व्हीसीच्या माध्यमातून उद्या शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता आयोजित बैठकीत घेणार आहेत. या बैठकीला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव, सचिव, आरोग्य सेवा आयुक्त, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व महानगरपालिका आयुक्त,  सर्व जिल्हा चिकित्सक, सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व तालुका अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 


देशासह राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आल्यने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (20 डिसेंबर) आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.


मुंबईतही कोरोनाचे वाढते रुग्ण, पालिका प्रशासन सतर्क


दरम्यान, मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी दक्षा शाह यांनी सांगितलं की, मुंबई उपाययोजना आणि सुविधांनी सुसज्ज आहे. रुग्णालयातील खाटा, औषधे यांचा आढावा घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार पुढील तयारी सुरु आहे. टेस्टींग करुन नव्या व्हेरीयंटचं संक्रमण तपासण्यात येणार आहे. आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यात येणार आहेत. नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नाही, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. देशासह राज्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात सध्या 100 हून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये नव्या JN1 व्हेरियंटच्या रुग्णांचाही समावेश आहे. मुंबईतही 19 कोरोना रुग्ण आढळले आहेत, मात्र दिलासादायक बाब म्हणजे यातील एकही रुग्ण नवीन JN1 व्हेरियंटचा नाही. सध्या सर्व रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या