कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur News) नागरी समस्यांचा पुरता बोजवारा उडाला असतानाच श्रेयवाद मात्र टोकाला पोहोचला आहे. आता शहरातील रस्ते कामानंतर आता कोल्हापुरात (Kolhapur) छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा अनावरणावरून श्रेयवाद रंगला आहे. याच पुतळा अनावरणाचा भव्यदिव्य कार्यक्रम पुन्हा करणार असल्याची घोषणा शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. विशेष म्हणजे चार दिवसापूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या उपस्थितीत अनावरण कार्यक्रम पार पडला होता.
तर कोल्हापूर जिल्ह्याचा कायापालट झाला असता
राजेश क्षीरसागर यांनी यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली. इतकंच नाही, तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यक्षमतेवर देखील राजेश क्षीरसागर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते म्हणाले की, दीपक केसरकर आणखी एक वर्ष पालकमंत्री असते तर कोल्हापूर जिल्ह्याचा कायापालट झाला असता, असा टोला त्यांनी लगावला आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांचंही नाव न घेता टीका केली. त्यांनी उचापती नेते असा उल्लेख करत टीका केली.
राष्ट्रवादी फोडून अजित पवार गट भाजपच्या मांडीला लावून बसल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी राजकीय कूस बदलताना अजित पवारांना साथ दिली. त्यामुळे मुश्रीफ अजित पवार गटाकडून मंत्री तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री देखील आहेत. तत्पूर्वी, कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांच्याकडे होती.
संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक स्मारकाचे लोकार्पण
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरातील महानगरपालिकेजवळील पापाची तिकटी येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक स्मारक लोकार्पण करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्यासह आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, वीर धाराऊ मातांचे थेट वंशज अमित गाडे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारक लोकार्पण सोहळा पार पडला होता. यावेळी स्मारकासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या