Kolhapur Loksabha Election: आगामी लोकसभेसाठी राज्यात महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. तीन पक्ष एकत्रित निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने राज्यातील 48 पैकी किती आणि कोणत्या जागा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार? याबाबत अंदाज बांधले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून 2019 मध्ये जिंकलेल्या 19 जागांवर दावा केला जात आहे. यामध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दुसरीकडे, 2019 ची परिस्थिती आता नसल्याचे सांगत कोल्हापुरात राष्ट्रवादीने कोल्हापूरच्या जागेवर दावा केला आहे. हे दोन दावे असतानाच आज काँग्रेसच्या आढावा बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील जागा काँग्रेसने लढाव्यात, अशी मागणी करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर, हातकणंगले आणि सांगलीच्या जागेचा समावेश आहे. त्यामुळे कोल्हापूरमधील दोन जागा कोणाच्या पदरात पडणार? याची चर्चा आतापासून सुरु झाली आहे.


कोल्हापूरचा आजवरचा इतिहास पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. अपवाद फक्त 2019 चा राहिला आहे. शिवसेनेकडून संजय मंडलिक मंडलिक विजयी झाले, पण संपूर्ण यंत्रणा सतेज पाटील यांचीच राहिली होती. त्यांनी आघाडी धर्म मोडून मंडलिकांचा विजयात हातभार लावला होता. 


1991 पासून संघर्ष अन् 2019 ला शिवसेनेचा विजय


कोल्हापूर हा सुरुवातीपासून राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेसशी संघर्ष करताना शेतकरी कामगार पक्षाचीही ताकदसुद्धा या जिल्ह्यात दिसून आली. मात्र, बेरजेच्या राजकारणात जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे. शिवसेनेकडून 1991 मध्ये लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदा उमेदवार उतरवण्यात आला. तेव्हापासून ते 2014 पर्यंत शिवसेनेला विजयाने हुलकावणी दिली. शिवसेनेकडून पहिल्यांदा 1991 मध्ये रामभाऊ फाळके, 1996 मध्ये रमेश देव, 1999 मध्ये विक्रमसिंह घाटगे, 1999 मध्ये मेजर जनरल शिवाजीराव पाटील, 2004 मध्ये धनंजय महाडिक, 2009 मध्ये विजय देवणे, 2014 आणि 2019 मध्ये संजय मंडलिक यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. या सर्वांना प्रत्येक निवडणुकीत लाखांवर मते मिळाली, पण विजयाने हुलकावणी दिली.


2014 पर्यंतच्या निवडणुकीत पाचवेळा शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 2019 मध्ये संजय मंडलिक यांना शिवसेनेकडून कोल्हापूरमधून दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी सतेज पाटील यांनी आघाडीचा आदेश धुडकावत आपली सगळी यंत्रणा संजय मंडलिक यांच्या विजयासाठी उभा करत विक्रमी मतांनी विजयी केले होते. धनंजय महाडिक यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे शिवसेनेचा खासदार पहिल्यांदाच कोल्हापुरातून निवडून आला. कोल्हापूरसह हातकणंगले मतदारसंघातही 2019 मध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला. 


कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काय स्थिती?


कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. कोल्हापूर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य स्वराज संस्थामध्येही सर्वाधिक याच दोन पक्षांना मानणारे गटा तटाच्या सत्ता आहेत. भाजपचा एकही लोकनियुक्त प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यात नाही. खासदार धनंजय महाडिक राज्यसभेवर आहेत. 


सहा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार कोणाचे?


चंदगड आणि कागलमध्ये अनुक्रमे राष्ट्रवादीचे राजेश पाटील आणि हसन मुश्रीफ आमदार आहेत. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण आणि करवीरमध्ये अनुक्रमे काँग्रेसच्या जयश्री जाधव, ऋतुराज पाटील आणि पी. एन. पाटील आमदार आहेत, तर राधानगरीमधून शिंदे गटात सामील झालेले प्रकाश आबिटकर आहेत. 


कोल्हापूर काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला 


कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 1952 पासून ते 1999 पर्यंत काँग्रेसच्याच उमेदवारांनी विजय मिळवला आहे. अपवाद फक्त 1957 ते 62 या पंचवार्षिकमध्ये राहिला असून शेकापच्या भाऊसाहेब महागावकर यांनी विजय मिळवला होता. या मतदारसंघातून सर्वाधिक काळ प्रतिनिधीत्व करण्याचा मान काँग्रेस उदयसिंहराव गायकवाड आणि सदाशिवराव मंडलिक यांनी केला आहे. गायकवाड 1980 पासून ते 1998 पर्यंत खासदार होते. त्यानंतर 1999 पासून 2014 पर्यंत सदाशिवराव मंडलिक यांनी प्रतिनिधीत्व केले. 2014 मध्ये धनंजय महाडिक यांनी, तर 2019 मध्ये शिवसेनेकडून संजय मंडलिक यांनी विजय मिळवला. 


समन्वयाने उमेदवार दिल्यास महाविकास आघाडीला यश निश्चित 


महाविकास आघाडीचा पहिला पॅटर्न राज्यात कोल्हापूर मनपात झाला होता. बंडाळीनंतर शिवसेनेला तगडा हादरा बसला आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय पाहिल्यास राधानगरी सोडल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच आमदार आहेत. त्यामुळे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हे ज्यांच्या पाठिशी राहतील तोच उमेदवार या ठिकाणी निर्णायक असेल यात शंका नाही. सध्या महाविकास आघाडी म्हणून लोकसभेला सामोरे जाण्याचा निर्णय तिन्ही पक्षांनी घेतला असला, तरी उमेदवार आणि मतदारसंघ निवडताना चांगलाच कस लागणार आहे.


सद्यस्थितीत कोल्हापूर लोकसभेला आमदारांच्या बळावरून आणि नेतृत्वावरून काँग्रेसची बाजू उजवी दिसून येते. कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीरमध्ये सतेज पाटील यांची स्वत:ची यंत्रणा आहे. तुलनेत कागलमध्ये मुश्रीफांची ताकद असली, तरी चंदगडमध्ये राजेश पाटील आमदार असूनही मर्यादित ताकद आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा जागेवर राष्ट्रवादीचा दावा मान्य केला जातो, की काँग्रेसला संधी दिली जाईल की उद्धव ठाकरे कोल्हापूरवर हक्क कायम ठेवणार? या प्रश्नाचे उत्तर मिळालेलं नाही आणि उमेदवारांबाबतही संभ्रम कायम आहे.


इतर महत्वाच्या बातम्या