Loksabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांच्या अवधी राहिल्याने राज्यासह देशात सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांकडून जय्यत तयारी सुरु झाली आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा असून त्यामधील दोन जागा कोल्हापूरमध्ये आहेत. या दोन जागांवरून सध्या महाविकास आघाडी आणि भाजप शिंदे गटाकडून दावे प्रतिदावे केले जात असले तरी प्रत्यक्षात कोणताही ठोस पर्याय नसल्याने उमेदवाराचा पत्ता नाही आणि पक्षांनी बांधले गुडघ्याला बाशिंग बांधल्याची स्थिती आहे. हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी लढण्याची केलेली घोषणा वगळता इतर सर्वच पक्षांसह दोन्ही विद्यमान खासदारांची परिस्थितीसुद्धा बिनबुडाची आहे.


राष्ट्रवादीत काय स्थिती आहे? 


आजच्या घडीला राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गट असाच सामना होण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक निवडणूक निवडणुकीनंतर स्पष्ट केले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची स्थिती पाहिल्यास महाविकास आघाडी तसेच शिवसेना आणि भाजपकडे कोणताही सक्षम पर्याय नसल्याचे चित्र आहे. या पक्षांकडे कोणताही ठोस उमेदवार नाही. मात्र, या सर्वच पक्षांकडून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. तथापी, आजवरचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा इतिहास पाहता दोन्ही पक्षांनी आयात करून उमेदवार लादू नये, अशीच भावना राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटात आहे. यावेळी हा डाव अंगलट येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.


राष्ट्रवादी काँग्रेसची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीमध्ये माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनाच उमेदवारीसाठी गळ घालण्यात आली. मात्र, त्यांची राज्याच्या राजकारणातील स्थिती पाहता त्यांनी लोकसभेसाठी कोणताही हिरवा कंदील अजूनही दाखवलेला नाही. त्याचबरोबर त्यांनीही इतर नावे मात्र सुचवली आहेत. व्ही. बी. पाटील, के. पी. पाटील यांची नावे चर्चेत आहेत. महाविकास आघाडीकडून चेतन नरके हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, त्यांना कोणताही ठोस शब्द आतापर्यंत देण्यात आलेला नाही. त्यांची संजय राऊत यांनी भेट घेतली होती. अजित पवार यांनीही त्यांची भेट घेतली. मात्र, त्यांना फक्त विचार केला जाईल त्याच्या पलीकडे कुठलाही शब्द अजून देण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याही नावाची चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्या राजवाड्यावर जाऊन झालेल्या गाठीभेटी बोलक्या आहेत. 


शिवसेना ठाकरे गट 


शिवसेना-भाजप युती असताना कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिवसेनेकडे होत्या. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत या दोन्ही जागा राष्ट्रवादीत आहेत. मात्र, कोल्हापुरातील विद्यमान धैर्यशील माने आणि संजय मंडलिक या दोन्ही खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना ठाकरे गटासमोरही सक्षम उमेदवार नसल्याचे चित्र आहे. कोल्हापुरातून विजय देवणे, तर हातकणंगलेमधून मुरलीधर जाधव इच्छूक आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडूनही जिंकलेल्या 19 जागांवर आग्रह धरण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला जागावाटपात दोन्ही जागा मिळाल्यास ऐनवेळी उसना उमेदवार देणार की शिवसैनिकाला संधी देणार याबाबतही उत्सुकता असेल. संजय घाटगे इच्छूक असले, तरी त्यांचा निर्णय मुश्रीफांच्या निर्णयावर असेल. 


भाजप शिंदे गट


कोल्हापुरात दोन्ही जागांवर भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी केंद्रीय पातळीवरील नेत्यांनी सुद्धा ताकद लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रावर पकड ठेवण्यासाठी कोल्हापुरात उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली असली, तरी उमेदवार कोण? या प्रश्नाचे उत्तर भाजपकडे नाही. सद्यस्थितीत दोन्ही जागांवर तगडा न मिळाल्यास धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांना भाजपच्याच चिन्हावर रिंगणात उतरवले जाईल, अशीच चर्चा आहे.


दुसरीकडे, अशीच स्थिती शिंदे गटाची सुद्धा आहे. विद्यमान खासदार त्यांचेच असले, तरी ते शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर लढतील याची कोणतीही श्वाश्वती नाही. दोन्ही खासदारांनी याबाबत कोणतेही थेट भाष्य आतापर्यंत केलेलं नाही. जिल्ह्यातील भाजपच्या व्यासपीठावर हे दोन्ही खासदार सातत्याने दिसून आले आहेत. त्यामुळे आजच्या घडीला ते रिंगणात नक्की असल्याची चिन्हे दिसत असली तरी ते कोणाकडून लढतील हे परिस्थितीवर अवलंबून असेल. दोन्ही खासदारांना बंडखोरीचा फटका बसणार का? यावरही ऐनवेळी चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


काँग्रेसकडूनही बैठकीचे आयोजन  


काँग्रेसकडूनही लोकसभेसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीमध्ये राज्यातील 48 जागांसंदर्भात चर्चा करून प्राथमिक माहिती सादर केली जाण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाहिल्यास सध्याच्या घडीला महाविकास आघाडीमध्ये तसेच भाजप शिंदे गटाकडे अजूनही कोणताही सक्षम पर्याय नसल्याचे चित्र आहे.


महाविकास आघाडीत उमेदवार कसा ठरणार?


महाविकास आघाडीत तीन पक्ष असल्याने जागावाटपाचा कळीचा मुद्दा असणार आहे. तिन्ही पक्ष समान जागावाटप करणार की स्थानिक ताकदीवर जागांमध्ये फेरबदल करून ताकदीचा उमेदवार दिला जाणार? याबाबतही अजून स्पष्टता आलेली नाही. मात्र, स्थानिक पातळीवर ज्या पक्षाची ताकद जास्त असेल, त्याला ती जागा सोडायची असा निर्णय महाविकास आघाडीत होऊ शकतो. तसे संकेतही मिळत आहेत. हे करत असतानाच बंडखोरांचाही सामना करावा लागू नये, यासाठी सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे. पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीतून तोच धडा महाविकास आघाडीला दिला आहे.


भाजप शिंदे गटाला किती अन् कोणत्या जागा देणार?


दुसरीकडे, भाजप राज्यात सर्वाधिक जागांवर उमेदवार देण्याच्या विचारात आहे. शिवसेना शिंदे गटाला जागावाटपात जुन्या सुत्राप्रमाणे संधी मिळणार की काही जागा देऊन बोळवण केली जाणार? हे सुद्धा औत्सुक्याचे असेल. शिंदे गटाने मागील सुत्राप्रमाणे जागांचा हट्ट धरल्यास कोल्हापुरातील दोन्ही उमेदवार काय करणार? आणि भाजपने केलेल्या तयारीचे काय होणार? याचे उत्तर आजघडीला तर नक्कीच नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या