कोल्हापूर : कोल्हापूर मनपाच्या (Kolhapur Municipal Corporation) प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या बदलीनंतर तब्बल अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून रिक्त असलेल्या आयुक्त पदावर अखेर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी (K Manjulakshmi) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अडीच आयुक्त नेमणुकीवरून सुरु असलेल्या राजकीय साठमारीला ब्रेक लागला आहे. स्वातंत्र्यदिनी शासकीय ध्वजारोहणासाठी कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठवडाभरात आयुक्त देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आठ दिवसांमध्ये घोषणा करण्यात आल्याने किमान आयुक्तपदाची कोंडी फुटली आहे. नव्या आयुक्तांसमोर आव्हानांचा डोंगर आहे. सर्वच समस्यांनी कोल्हापूर तुंबले असून त्याचा निपटारा पहिल्या दिवसांपासून करावा लागणार आहे. आयुक्त पद रिक्त असल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे पदभार देण्यात आला होता.


दोन गटाच्या वादात अडीच महिने पद रिक्त  


मनपा प्रशासक कादंबरी बलकवडे यांची 2 जून रोजी बदली झाल्यानंतर कोल्हापूरसाठी कोणी आयुक्त देता आयुक्त अशी झाली होती. बेवारस झालेल्या कोल्हापूर मनपाचा कारभार पूर्णत: ठप्प झाला होता. शहरातील नागरी समस्या गंभीर झाल्या असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये आयुक्त आपल्याच मर्जीतील असावा यासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून नुरा कुस्ती सुरु होती. तुमचा की आमचा यावरून वाद चांगलाच पडद्यामागून सुरु होता. त्यामुळे इतर जिल्ह्यातील प्रशासकीय बदल्या होऊन पदाधिकाऱ्यांची नेमणूक होत असताना कोल्हापूरला बेवारस होण्याची वेळ आली होती. मनपा सभागृहाची मुदत संपून तीन वर्ष होत आहेत. त्यामुळे निर्ढावलेल्या मनपा प्रशासनाला जाब विचारायचा तरी कोणाकडे? अशी स्थिती निर्माण झाली होती. 


शहर आता तरी मोकळा श्वास घेणार?


कोल्हापूर शहर पूर्णत: समस्यांच्या गर्तेत असून येणाऱ्या पर्यटकांचे कचरा आणि दुर्गंधीनेच स्वागत होत आहे. गुडघाभर खड्डे, अमृतजल योजनेसाठी रस्ते खोदण्यात आल्याने त्यांची गावच्या पाणंदीप्रमाणे झालेली अवस्था, मोडकळीस आलेली केएमटी वाहतूक, नुसत्याच आश्वासनात अडकलेली हद्दवाढ, कचरा उठाव, उद्यानांची मोडतोड, उत्पन वाढीचे आव्हान आदी समस्यांमुळे संपूर्ण शहर समस्यांच्या गर्तेत आहे. 


नवीन आयुक्त आल्याने जादूची कांडी फिरणार नसली, तरी किमान बेवारस मनपाला वाली मिळाल्याने निवडणूक होईपर्यंत प्रशासनाचा गाडा सुरळीत आणि शिस्तीत पुढे नेला जाईल, इतकी माफक अपेक्षा असेल. मनपामध्ये नगरसेवक काम करू देत नाहीत, असाही आवाज यापूर्वी कानावर येत होता. मात्र, आता शहराची जबाबदारी प्रशासकांवर असल्याने सुस्त अधिकारी आणि निर्ढावलेल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कारभार हाकावा लागणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या