Kolhapur Weather : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून थंडी जाणवू लागली आहे. तापमानात घसरण झाल्याने थंड जाणवू लागली आहे. रविवारी शहरात 19 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात घट झाली. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. कधी परतीचा पाऊस, कधी उन्हाळ्याप्रमाणे चटके, तर कधी ढगाळ, तर कधी अचानक थंडी असे प्रकार सातत्याने होत आहेत. बदलत्या वातावरणाचा गळीत हंगामावर चांगलाच परिणाम झाला आहे. दुसरीकडे रबी पिकांना मात्र घसरलेल्या तापमानाचा आणि अवकाळी पावसाचा फायदा झाला आहे. 


वातावरणातील बदलामुळे डिसेंबर आला तरी जाणवण्याइतपत थंडी पडली नव्हती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा थंडी वाढली आहे. दिवसभर वातावरण सामान्य असते. संध्याकाळी मात्र हवेतील गारठा वाढू लागतो. रात्री नऊ नंतर तापमानात घट होत आहे.डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात उत्तर केरळ ते मध्य पूर्व अरबी समुद्रापर्यंत तयार झालेली चक्रीय स्थिती तसेच किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील तापमानात बदल झाला होता. त्यामुळे करवीर, शाहूवाडी, गडहिंग्लज, भुदरगड आणि आजरा तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. 


राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानात घट 


कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये घट झाली आहे. सर्वांत कमी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पंढरी असलेल्या निफाड तालुक्यात झाली आहे. निफाडमध्ये 6.8 अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली आला आहे.  धुळे जिल्ह्यातही 8 तापमानाची नोंद झाली.


महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद?



  • मुंबई (सांताक्रुज) - 16

  • मुंबई (कुलाबा) - 19.2

  • निफाड - 6.8

  • धुळे - 8 

  • औरंगाबाद - 11

  • नाशिक - 10.2

  • बारामती - 12.3

  • महाबळेश्वर - 14 

  • सातारा - 12.9

  • परभणी - 16.4

  • जळगाव - 13.5

  • पुणे - 12.1

  • जालना - 14.5

  • रत्नागिरी - 17.6

  • माथेरान - 14.6

  • नवी मुंबई - 20 

  • सोलापूर - 19.4


इतर महत्वाच्या बातम्या