Maharashtra-Karnataka Border Dispute : गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रातील भूभागावर दावा करण्यासह चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्या कर्नाटक सरकार विरोधात एल्गार करण्यासाठी (Maharashtra-Karnataka Border Dispute) महाराष्ट्र एकीकरण समितीने रणशिंग फुंकले आहे. बेळगावमधून हजारो कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये जिल्हाधिक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून महाराष्ट्राचे सीमाप्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसह बेळगावमधून हजारो कार्यकर्ते बसेसने कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. कोल्हापूर कोल्हापुरातील जिल्हाधिकाऱ्याला समोर हे धरणे आंदोलन होईल.


कर्नाटक पोलिसांनी बॅरिकेटिंग करत बंदोबस्त वाढवला


दरम्यान, सीमावासियांचे आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार असून यासाठी बेळगाव मधून आंदोलनासाठी सीमावासीय रॅलीने येणार आहेत. या रॅलीचे कोगनोळी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राकडून स्वागत केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कोगनोळी टोल नाक्याजवळ कर्नाटक पोलीसाचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कोगनोळी टोल नाक्यासह पुढे जिथेपर्यंत कर्नाटकची ह्द आहे त्या शेवटच्या ठिकाणापर्यंत कर्नाटक पोलिसांनी बॅरिकेटिंग करत बंदोबस्त वाढवला आहे. कोल्हापूरमधून टोलनाक्याकडे जाणाऱ्यांना अडवण्यासाठी हा बंदोबस्त दिसत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे महाराष्ट्राविरोधात कर्नाटक सरकारने महाराष्ट्राविरोधात ठराव केल्यानंतर आज महाराष्ट्र सरकारकडून कर्नाटक सरकार विरोधात ठराव होण्याची शक्यता आहे.  (Maharashtra-Karnataka Border Dispute)


महाराष्ट्र सरकारने देखील एक दिवस महाराष्ट्र बंद करावा


दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीची (Maharashtra Ekikaran Samiti Agitation) 21 डिसेंबर रोजी मराठा मंदिर येथे बैठक पार पडली होती. या बैठकीत सगळ्यांची मते जाणून घेऊन कोल्हापूरला जाऊन धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. बैठकीला माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगावात आंदोलन केले तर कर्नाटकचे पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार, यासाठी कार्यकर्त्यांनी कोल्हापूरला जाऊन आंदोलन करावे अशी इच्छा बैठकीत व्यक्त केली. महाराष्ट्र सरकारने देखील एक दिवस महाराष्ट्र बंद करुन आपण सीमावासियांच्या पाठिशी आहोत असे कर्नाटक सरकार आणि कन्नड संघटनांना दाखवून द्यावं असं मतही बैठकीत व्यक्त करण्यात आले. पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या नावे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदन देण्यात येणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या