Maharashtra Ekikaran Samiti Agitation : बेळगावमधील (Belgaon) सीमावासीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) नेतृत्वाखाली आज (26 डिसेंबर) कोल्हापुरात (Kolhapur) येऊन धरणे आंदोलन करणार आहे. कर्नाटक सरकारकडून (Karnatak Government) सुरु असलेल्या दडपशाहीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस पावले उचलावीत, यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळपासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Dispute) पेटलेला असतानाच आता महाराष्ट्र एकीकरण समिती कोल्हापुरात धरणे आंदोलन करणार आहे.
दोन ते अडीच हजार कार्यकर्ते बेळगावहून कोल्हापुरात
बेळगावात होणाऱ्या कर्नाटक विधीमंडळाच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला परवानगी नाकारुन दडपशाही करुन पोलिसांनी नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आज कोल्हापूर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरला धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी दोन ते अडीच हजार कार्यकर्ते बेळगावहून जाणार आहेत.
महाराष्ट्र सरकारने एक दिवस बंद करावा, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत मत
महाराष्ट्र एकीकरण समितीची 21 डिसेंबर रोजी मराठा मंदिर येथे बैठक पार पडली. या बैठकीत सगळ्यांची मते जाणून घेऊन कोल्हापूरला जाऊन धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. बैठकीला माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगावात आंदोलन केले तर कर्नाटकचे पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार, यासाठी कार्यकर्त्यांनी कोल्हापूरला जाऊन आंदोलन करावे अशी इच्छा बैठकीत व्यक्त केली. महाराष्ट्र सरकारने देखील एक दिवस महाराष्ट्र बंद करुन आपण सीमावासियांच्या पाठिशी आहोत असे कर्नाटक सरकार आणि कन्नड संघटनांना दाखवून द्यावं असं मतही बैठकीत व्यक्त करण्यात आले. पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या नावे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदन देण्यात येणार आहे.
पोलीस महासंचालकांकडून महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कन्नड संघटनेच्या नेत्यांची संयुक्त बैठक
कर्नाटकचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी 23 डिसेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कन्नड संघटनेच्या नेत्यांची संयुक्त बैठक घेतली होती. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी ही बैठक घेतली होती. आंदोलनासाठी प्रत्येक वेळी तुम्ही परवानगी मागता आम्ही तुम्हाला परवानगी देतो. सध्या बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन काळात कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही खबरदारी घेत आहोत, असं आलोक कुमार यांनी बैठकीत सांगितलं. बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर यांनी मराठी भाषिकांच्या भावना मांडल्या. कन्नड संघटनेचे नेतेही बैठकीला उपस्थित होते.