कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महिला मेळावा पार पडला. यामध्ये विविध लाभार्थी महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी एमआयडीसी मंजुरीचे पत्रही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खासदार धैर्यशील माने यांना देण्यात आले. यावेळी बोलताना शिंदे यांनी महिला कल्याणासाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
नव्या संसदेत पहिलं विधेयक महिला आरक्षणाचं मांडलं
मुख्यमंत्री म्हणाले की, आज सर्वसाधारण शेतकरी राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे तुमच्या भावना, तुमच्या समस्या मला माहिती आहेत. आज पहाटे 4 वाजेपर्यंत काम केलं आणि आता तुमच्या दर्शनाला आलो आहे. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. पीएम मोदी यांनी नव्या संसदेत पहिलं विधेयक महिला आरक्षणाचं मांडलं. जगात नावलौकिक निर्माण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
आपल्या वडिलांना सोडून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहणारे कुठं?
ते पुढे म्हणाले की, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर मी पाहिला आहे. कोल्हापूरकरांनी पुरात आपल्या जनावरांना देखील आपल्यासोबत दुसऱ्या मजल्यावर नेलं. हे कोल्हापूरकर कुठं आणि 26 जुलैच्या महापुरात आपल्या वडिलांना सोडून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहणारे कुठं? असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला.
दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले की, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. महिलांसाठी महिला समुपदेशन केंद्रही सुरू करण्याचा निर्णय घेतला. आरोग्य विभागाच्या माध्यमातून महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीत म्हणून महिलांच्या तपासणी केल्या. तपासणी झाल्यानंतर काही दुर्दैवाने काही त्रास असल्यास उपचार मोफत केले. यामध्ये लाखो महिलांनी सहभाग घेतला.
कोल्हापूर येथे पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पुरामध्ये मीच आलो होतो. याठिकाणी माणुसकी मी बघितली. कोल्हापूरमध्ये आणि इथेही आलो होतो. मला माणुसकी पाहायला मिळाली. एक दुसऱ्याला मदत करत होते. ते म्हणाले की, कोल्हापूरचा पूर कायम बंद झाला पाहिजे, इचलकरंजीमध्ये पुराचा त्रास होऊ नये यासाठी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून 3200 कोटींचा प्रकल्प आपण करत आहोत. या प्रकल्पातून कायमस्वरूपी हा त्रास दूर होईल. पंचगंगा प्रदूषणासाठी देखील आपण 750 कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला आहे. दूषित पाणी जाऊ नये म्हणून जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे तिथे एसटीपी बांधण्याचा आपला प्रयत्न आहे. कोल्हापूर खंडपीठाबद्दल देखील मी आपल्या महाधिवक्तांशी बोललो आहे.
इतर महत्वाच्या बातम्या