कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksabha) महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या चिन्हावर (Maha Vikas Aghadi) करवीर संस्थांनचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. त्यांच्याविरोधात झालेल्या टीकेनंतर आमदार सतेज पाटील यांनी त्यांचा खोचक शब्दात समाचार घेतला होता आणि शाहू महाराजांवर टीका करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येत असल्याचे म्हटले होते. महाराजांबद्दल आदर असेल, तर बिनविरोध निवडून द्या, असे आव्हान सुद्धा दिले होते. यानंतर आता शिंदे गटाचे खासदार आणि कोल्हापूर लोकसभेतील संभाव्य उमेदवार संजय मंडलिक यांनी (Sanjay Mandlik on Satej Patil) आता सतेज पाटील यांनी दिलेल्या आव्हानाला खोचक शब्दात टोला लगावला आहे.
तर मोदींना देखील बिनविरोध पंतप्रधान करा
संजय मंडलिक म्हणाले की, सतेज पाटील यांनी यादी द्यावी, सर्वच निवडणुका बिनविरोध करा. इतकेच नव्हे तर मोदींना देखील बिनविरोध पंतप्रधान करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. संजय मंडलिक यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी तयारी गेल्या पाच वर्षांपासून केली आहे. उमेदवार सुद्धा मीच असेल आणि जिंकून सुद्धा येणार असल्याचे संजय मंडलिक म्हणाले.
त्यांनी सांगितले की शाहू महाराज यांच्याबद्दल आदर आहे, पण ही निवडणूक वैचारिक असल्याचे म्हणाले. पाटील यांनी यादी द्यावी सर्वच निवडणुका बिनविरोध कराव्यात. त्यांनी सांगितले की, शिंदे गटातील विद्यमान खासदारांनी कोणताही दबाव गट तयार केलेला नाही. ज्यावेळी आम्ही पाठिंबा दिला त्यावेळी विद्यमान खासदार उमेदवार असतील असे सांगण्यात आलं होतं असेही संजय मंडलिक यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री आज कोल्हापुरात
दरम्यान, आज शिंदे गटाचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये शक्तीप्रदर्शन होत आहे. इचलकरंजीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचले आहेत. त्यामुळे आजच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर काही भाष्य करणार का? याकडे सुद्धा राजकीय वर्तळाचं लक्ष लागून राहिलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर लोकसभेवर भाजपने दावा केल्याची चर्चा आहे. इतकंच नव्हे तर विद्यमान शिंदे गटातील खासदारांना भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल असेही बोललं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर आणि हातकणंगले जागेवर स्पष्ट भाष्य करणार का? याकडे लक्ष असेल.
इतर महत्वाच्या बातम्या