कोल्हापूर : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्यातून मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री प्रकाश आबिटकर यांना संधी मिळाल्यानंतर आज पहिल्यांदाच ते कोल्हापुरात दाखल झाले. कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी एकत्रपणे करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक देखील उपस्थित होते.  


मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला 


यावेळी बोलताना मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याचे सांगत आभार मानले. मला चांगली संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादामुळेच शिवसेनेला कोल्हापुरात पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं. सहा आमदार असताना देखील कोल्हापूरला मंत्रिपद मिळालं नसल्याची खंत मंत्री आबिटकर यांनी व्यक्त केली. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. त्यांनी सांगितले की, कोल्हापूरकरांनी शिवसेनेला भरभरून दिलं आहे. सहा आमदार आणि दोन खासदार दिले. त्या तुलनेनं कोल्हापूरला शिवसेनेनं काहीच दिलं नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरला मंत्रिपद दिलं. यामुळे कोल्हापुरातील शिवसैनिकांना अधिक बळ मिळणार आहे. 


पालकमंत्री बाबत काय म्हणाले?


दरम्यान, काळम्मावाडी धरण संदर्भात काम करण्यासाठी टेंडर फायनल झालं असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. काही त्रुटी आहेत त्या आज अधिकाऱ्यांना भेटून पूर्ण केल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले. धरणाची गळती काढण्याचं काम जलद गतीने केले जाईल. त्याची जबाबदारी मंत्री म्हणून आमची असेल. पालकमंत्री बाबत बोलताना पक्षाचे तिन्ही नेते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असेही आबिटकर यांनी नमूद केले.  


कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग रद्द


शक्तीपीठ आपल्या जिल्ह्यातून देखील व्हावा यासाठी धावपळ करणारा मी होतो, असे आबिटकर यांनी सांगितले. मात्र, आपल्या शेतकऱ्यांचे नुकसान होतं आहे, शेतकऱ्यांचा विरोध होत आहे, त्यामुळे हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली. विकास होत असताना आपल्या माणसाचं नुकसान होऊ नये याची जबाबदारी घेण्याचं काम लोकप्रतिनिधींचं आहे. त्यामुळे कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला असल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या