Eknath shinde in Kolhapur : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने काल निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या. चंद्रकांत पाटील यांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीवरून कोल्हापूरमध्ये येणार आहेत.  


आज दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4 वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते छत्रपती संभाजी पार्क येथे पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचतील. सायंकाळी सव्वा पाच वाजता मुख्यमंत्री विमानाने मुंबईकडे रवाना होतील.


दरम्यान, काल पंचगंगा स्मशानभूमी येथे सरस्वती पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींनी सर्व भावंडांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवरच चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सर्व‌ कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहे.


चंद्रकांत पाटील काल कोल्हापूरमध्ये होते. त्यांची भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत सायंकाळी सहा वाजता बैठक होती. त्यापूर्वी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गेले. मात्र, बैठकीला जाण्यापूर्वी आपण आईंना भेटून येतो असे चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानंतर ते आईला भेटण्यासाठी संभाजीनगर येथील निवासस्थानी गेले. आईंना भेटल्यानंतर ते कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी निघतानाच त्यांच्या मातोश्रींनी अखेरचा श्वास घेतला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या