Dhairyasheel Mane : शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे हातकणंगले मतदारसंघाचे बंडखोर खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या घरावर उद्या शिवसैनिकांचा मोर्चा निघणार आहे. धैर्यशील माने यांना जाब विचारण्यासाठी हा शिवसैनिकांचा मोर्चा असणार आहे. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे. यावर धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध करुन त्यांच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. शिवसैनिकांच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याची माझी तयारी असल्याचं खासदार माने यांनी म्हटलं आहे.


नेमकं धैर्यशील माने यांनी काय म्हटलंय


उद्या शिवसैनिकांचा धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा निघणार आहे. या पार्श्वभूमीवर धैर्यशील माने यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं आहे. शिवसेनचे काही पदाधिकारी भावनाविवश झाल्यामुळं नेमकं हे का घडलं? कशामुळं घडलं? यासाठी त्यांचा होणार आक्रोश व संवेदना मी शिवसैनिक म्हणून समजू शकतो. याच उत्तर घेण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला कुठल्याही प्रकारचा विरोध होता कामा नये. मोर्चामध्ये सहभागी होणारा प्रत्येकजण हा आपलेच बंधू-भगिनी आहेत. त्यांचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देमं हे त्यांचा सहकारी म्हणून माझं कर्तव्य असल्याचे धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे.


मोर्चाला कुठल्याही प्रकारचा प्रतिकार होता कामा नये


सध्या संसदेचं अधिवेशन असल्यामुळं मी दिल्लीमध्ये आहे. मतदारसंघात आल्यानंतर वस्तुस्थितीबाबत. माझ्या भूमिकेबाबत मी प्रत्येकाशी बोलण्याचा प्रयत्न करेन. तोवर संयम राखून मतभेद होणार नाहीत याची दक्षता सर्वांनी घ्यावी. मोर्चाला कुठल्याही प्रकारचा प्रतिकार किंवा प्रतिवाद होता कामा नये. तसेच प्रशासनाननेही मोर्चाला सहकार्य करावं ही विनंती असल्याचे धैर्यशील माने यांनी पत्रकात म्हटले आहे. 


कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यामध्ये कोल्हापुरातील या दोन्ही खासदारांचा समावेश होता. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. शिंदे यांच्या सोबत जिल्ह्यातील राज्यमंत्री, आमदार, माजी आमदार यांनी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी जिल्ह्यातील दोन्ही खासदारांची भूमिका तळ्यात होती. खासदार मंडलिक यांनी तर फुटीर शिवसैनिकांना उद्देशून 'गेले ते बेन्टेक्स राहिले ते सोने' अशा शब्दात निशाणा साधला होता. धैर्यशील माने यांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, या दोघांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे.