मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली असा परिवार आहे. आज सांयकाळी साडेआठ वाजता कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे सरस्वती पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींनी सर्व भावंडांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवरच चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सर्व कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहे.
चंद्रकांत पाटील हे दुपारी कोल्हापुरात आले होते. आज त्यांची भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत सायंकाळी सहा वाजता बैठक होती. त्यापूर्वी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गेले होते. मात्र बैठकीला जाण्यापूर्वी आपण आईंना भेटून येतो असे चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानंतर ते आईला भेटण्यासाठी संभाजीनगर येथील निवासस्थानी गेले. आईंना भेटल्यानंतर ते कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी निघतानाच त्यांच्या मातोश्रींनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.