Hasan Mushrif on Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेला खिंडार पडले आहे. अनेक बंडखोर आमदारांकडून राष्ट्रवादी, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच अजित पवार यांच्याकडून बोचरा वार सुरु असतानाच कोल्हापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते आणि ठाकरे सरकारमधील माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानल्याने राजकीय भूवया उंचावल्या असून त्यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघात श्रमिक वसाहतीमध्ये मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक करत आभार मानले.
मुश्रीफ यावेळी बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांनी कागल तसेच गडहिंग्लज, मुरगुड या शहरांच्या विकासकामासाठी जेवढा निधी मागितला, तेवढा त्यांनी दिला. शिंदे यांनी माझा नेहमीच सन्मान केला. मुश्रीफ पुढं म्हणाले की, आज जरी ते विरोधी सरकारचे मुख्यमंत्री असले तरी कागलला कोट्यवधी रूपयांचा विकास निधी दिल्याने मला जाहीर आभार मानले पाहिजेत.
कोल्हापूर जिल्ह्यात शिंदेंच्या बंडाळीने शिवसेनेला खिंडार
एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातही शिवसेनेला खिंडार पडले. एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, सहयोगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर हे शिंदे गटाच्या गळाला लागले. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनीही पक्षाशी बंडखोरी करत शिंदे कळपात सामील झाले आहेत.
संजय मंडलिक यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीकडून आगामी लोकसभेसाठी हसन मुश्रीफ यांच्याच नावाची चर्चा आतापासूनच रंगली आहे. कागल तालुक्याच्या राजकारणात शिंदे गट आणि भाजप प्रबळ झाला असतानाही हसन मुश्रीफ यांच्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर कौतुकाने चांगली चर्चा रंगली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या