कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही परिस्थितीत हातकणंगले (Hatkanangle Lok Sabha) लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार आणि खासदार कसा असतो हे दाखवून देणार असे म्हणत शड्डू ठोकलेल्या अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांची तलवार मॅन करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं आहे. शनिवारी झालेल्या पहिल्या भेटीमध्ये प्रकाश आवाडे यांनी लढण्याचा निर्णय कायम ठेवल्यानंतर आज धैर्यशील मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात प्रकाश आवाडे यांच्या घरी पोहोचले.
प्रकाश आवाडेंकडून लढण्याची तलवार म्यान
प्रकाश आवाडे यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, रामदास कदम यांच्यासह पोहोचले. यावेळी प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा करत यांची मनधरणी केली. त्यामुळे आवाडे यांनी आपली तलवार म्यान केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकाश आवाडे यांना सोबत घेऊनच माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले. त्यामुळे एक प्रकारे मुख्यमंत्री शिंदे यांना हातकणंगले मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये झालेली कोंडी फोडण्यात यश आलं आहे.
मुख्यमंत्री शिंदेंकडून कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर लक्ष केंद्रित
जर प्रकाश आवाडे हातकणंगलेमधून उभे राहिले असते तर इचलकरंजीमधील मतविभागणीचा मोठा धोका होता. त्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांना धोका होता. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. शनिवारी संध्याकाळी त्यांनी कोल्हापूरचा दौरा करत रविवारी पहाटेपर्यंत हातकलंगले लोकसभा मतदारसंघासाठी जोडण्या केल्या होत्या.
प्रकाश आवाडे यांच्या बंडखोरी मागे कोण?
शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जनसुराज्य आमदार विनय कोरे यांच्या भेटीगाठी घेत गोकुळमध्ये सुद्धा त्यांनी फोनाफोनी केली होती. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या केल्या असल्याचे दिसून आले. मात्र, प्रकाश आवाडे माघार घेत नसल्याने महायुतीची हातकणंगलेमध्ये कोंडी झाली होती. प्रकाश आवाडे यांच्या बंडखोरी मागे कोण? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाडे यांच्या घरी जात त्यांची मनधरणी करीत अखेर बंड मोडून काढलं आहे. त्यामुळे माने यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या