कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी धैर्यशील माने प्रचारार्थ तीन दिवसांपूर्वी पहाटेपर्यंत जोडण्याकेल्यानंतर आता पुन्हा एकदा आज (15 एप्रिल) ते कोल्हापूरमध्ये येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोल्हापूरमध्ये येत आहेत. मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा येणार आहेत. कोल्हापुरात महायुतीकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. 


45 मिनिटांच्या चर्चेनंतरही बंडखोरीचा निर्णय कायम


दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढत होत असल्याने धैर्यशील माने धर्मसंकटात सापडले आहेत. त्यामुळे माने यांच्या विरोधातील धार कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले आहेत. तीन दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये येऊन त्यांनी आमदार विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेत प्रचारामध्ये सक्रिय होण्याचे आवाहन केलं होतं. या मतदारसंघातून बंडखोरी करत असलेल्या अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीमध्ये कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या 45 मिनिटांच्या चर्चेनंतरही बंडखोरीचा निर्णय कायम ठेवला होता. 


उमेदवारी मागे घेणार का?


या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आज प्रकाश आवाडे यांची भेट घेणार आहेत. कोल्हापुरातील आवाडे यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार असून या भेटीमध्ये पुन्हा एकदा ते प्रकाश आवाडेंची मनधरणी करणार आहेत. त्यामुळे प्रकाश आवाडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द मानून आपली उमेदवारी मागे घेणार का? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. आवाडे हे विधानसभेचा शब्द पक्का करण्यासाठी बंडखोर करून आपलं उपद्रव मूल्य दाखवून देत आहेत का? अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. 


हातकणंगलेमध्ये पंचरंगी लढत


माने यांच्या विरोधात प्रकाश आवाडे रिंगणात उतरल्यास इचलकरंजीमधील मत विभागणीचा मोठा फटका माने यांना बसू शकतो. या सर्व पार्श्वभूमीवर आवाडे यांचं बंड थोडक्यात थंड करण्यासाठी मुख्यमंत्री गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. मात्र, आवाडे यांनी प्रतिसाद दिलेला नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये राहुल आवाडे प्रयत्नशील होते. मात्र, थेट प्रकाश आवाडे यांनीच उमेदवारीची घोषणा केल्याने हातकलंगलेमध्ये आता पंचरंगी लढत होत आहे.


या लढतीमध्ये कोणाचा विजय होणार याबाबत आता अनेक अडाखे बांधले जात असले, तरी अंतिम निकाल हा चार जून रोजी समजणार आहे. या मतदारसंघातून राजू शेट्टी रिंगणात आहेत. वंचितकडून डीसी पाटील रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी दिल्याने लढत आणखी रंगतदार झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोल्हापूरच्या तुलनेत हातकलंगलेमध्ये राजकीय भाऊगर्दी झाल्याने कोण कोणाचा घात करणार? याचे उत्तर आता चार जून रोजी मिळणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या