Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday : प्रदीर्घ कालावधीनंतर कुस्तीपंढरी कोल्हापुरात बेमुदत निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) चे चिफ पेट्रन शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 170 निकाली कुस्त्यांसाठी दंगल सुरु झाली आहे. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने मैदान आयोजित करण्यात आलं आहे.
मुख्य मोठ्या पाच कुस्त्यांसह 107 चटकदार कुस्त्यांसाठी तब्बल 15 लाख बक्षिसांची घोषणा माजी खासदार संभाजीराजे व माजी आमदार मालोजीराजे यांनी केली आहे. शाहू छत्रपती महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार चांदीची गदा देऊन करण्यात येणार आहे. कुस्ती स्पर्धेचा बक्षीस समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री दीपक केसरकर,उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार, आमदार यांच्या हस्ते होणार आहे.
कुस्तीसाठी जय्यत तयारी कोल्हापूर महानगरपालिका व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडून करण्यात आली आहे. आखाड्यात नवीन लाल माती टाकून मैदान परिसरातील डागडुजी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रथम क्रमांकाची कुस्ती विजयी शाहू गंगावेस तालमीचा पैलवान महान भारत केसरी सिकंदर शेख विरुद्ध पंजाबचा पैलवान हिंदकेसरी भारत केसरी गौरव मच्छीवाला यांच्यात होईल. गंगावेस तालमीचा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर विरुद्ध पंजाब गुरुभवानी आखाड्याचा मल्ल सतनाम सिंग यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी लढत होईल.
सिकंदर शेखने पंजाब,उत्तर प्रदेश, हरियाणामधील नामवंत मल्लांना अस्मान दाखवून पंजाबमध्ये सर्वाधिक कुस्त्या जिंकलेला मल्ल म्हणून नावलौकिक मिळवला आहे. गौरव मच्छीवाला हा हिंदकेसरी असून त्याने आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
संभाजीराजेंकडून आठवणींना उजाळा
आज होत असलेल्या जंगी कुस्ती मैदानाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी आठवणींना उजाळा दिला आहे. सन 1934 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदान भरवण्यात आले होते. त्यावेळी या कुस्तीसाठी ज्या पद्धतीने जाहिरात करण्यात आली होती, अगदी त्याच पद्धतीने उद्या होत असलेल्या कुस्ती मैदानाची जाहिरात करण्यात आली आहे. संभाजीराजे यांनी माहिती देताना म्हटले आहे की, कोल्हापूरची क्रीडा परंपरा अतिशयसमृद्ध आहे. 'कुस्तीपंढरी' म्हणून ओळखलं जाणारं कोल्हापूर भारतात प्रसिध्द आहे. पुरातन काळापासून चालत आलेली एक विद्या म्हणजे मल्लविद्या! 'यथा राजा तथा प्रजा' या उक्तीप्रमाणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी मल्लविद्या जोपासण्याचे कार्य करवीर नगरीत केलं.
इतर महत्वाच्या बातम्या