Pravin Darekar on Sanjay Raut : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सुरु असलेल्या खणाखणीत आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी संजय राऊत यांचा वैचारिक ऱ्हास झाल्याची बोचरी टीका (Pravin Darekar on Sanjay Raut )केली आहे. प्रवीण दरेकर यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना संजय राऊत यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात अशा पद्धतीचा वाद योग्य नाही, ती संस्कृती नाही. नारायण राणे हे सडेतोड बोलतात ती त्यांची स्टाईल आहे, कधी कधी त्याचे समर्थन करता येणार नाही, पण संजय राऊत यांचा पहिल्यांदा इतका तोल ढासळलेला दिसत आहे. 100 टक्के वैफल्यग्रस्त झाल्याचं त्यांच्या बोलण्यावरून दिसत आहे. हमरीतुमरीवर येणं म्हणजे राऊत यांच्या वैचारिकतेचा ऱ्हास झाल्याचं दिसतं आहे.
सरकार उत्तम पद्धतीने काम करत आहे
दरेकर यांनी सरकार उत्तम पद्धतीने काम करत असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, शिंदे आणि फडणवीस साहेबांच्या क्षमतेने अनेक निर्णय घेतले जातात. दोन वर्षे सोडा पुढचे 25 वर्षे आम्ही सत्तेत राहू, काही अडचण नाही, असा दावा त्यांनी केला.
गिरे तो भी टांग उपर
दरेकर यांनी अजित पवारांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावरून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. गिरे तो भी टांग उपर असं असं अजित पवारांचं झालं असल्याचे दरेकर म्हणाले. विधान चुकल्यानंतर, विरोध झाल्यानंतर दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती, पण अजित पवार यांच्यात इतका अहंकार आहे, की आम्ही सगळ्यांवर आहोत ते त्यांच्यातून जायला तयार नाही.असं विकृत प्रदर्शन कधीच झालं नाही ते अजित पवार आणत आहेत.
संजय राऊत आदित्य ठाकरेंना ओसाड गावचा पाटील करायला निघालेत
दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे नेतृत्व देण्यावरून संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा खोचक शब्दात समाचार घेतला. संजय राऊत यांनी कारभार द्यायला कशाला पाहिजे, आधीच कारभार आदित्य ठाकरे यांच्याकडे गेला आहे. एकनाथ शिंदे देखील केबिनच्या बाहेर असत. त्यांच्या खात्याच्या बैठका आदित्य ठाकरे घेत होते. ठाकरे गटाकडे आता शिवसेना किती राहिली आहे? संजय राऊत आदित्य ठाकरे यांना ओसाड गावचा पाटील बनवायला निघालेत.
संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर सावध भूमिका
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तार होण्यावर भाष्य केल्यानंतर दरेकर यांनी सावध भूमिका घेतली. मला माहीत नाही कधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब याबाबत निर्णय घेत असतात आमदारांच्या पातळीवर हा निर्णय होत नाही, त्यामुळे कुणी हवेत तारखा देऊ नये.
महत्वाच्या इतर बातम्या :