Kolhapur News : राज्य मंत्रिमंडळाकडून कोल्हापुरात (Kolhapur News) नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय (government engineering college) सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी याबाबत माहिती दिली. याबाबतचा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासनाला सादर केला होता. अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी 221 कोटी 48 लाख रुपये इतक्या खर्चासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून (2023-24) सुरु होणाऱ्या या महाविद्यालयाची प्रवेश क्षमता 300 विद्यार्थी असणार आहे. महाविद्यालय सुरु करण्याबाबतच्या काही तांत्रिक बाबींच्या पूर्ततेची प्रक्रिया आता सुरु होईल. दरम्यान, महाविद्यालयाची सारी व्यवस्था पहिल्या टप्प्यात शासकीय तंत्रनिकेतनमध्ये असेल.


टप्प्याटप्प्याने पदे भरली जाणार 


दरम्यान, अभियांत्रिकी महाविद्यालय ((government engineering college) सुरु करण्यासाठी टप्प्याटप्प्याने एकूण 65 शिक्षकीय आणि 50 शिक्षकेतर अशी एकूण 115 पदे मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. चंद्रकात पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, "कोल्हापूर जिल्ह्यात ऑटोमोबाईल, ऑटोमेशन, टेलिकम्युनिकेशन, ऊर्जानिर्मिती आदी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक विस्तार झाला आहे. सूतगिरणी, साखर कारखाने, कापड गिरणी, फौंड्री, मशिन शॉप आदींचा औद्योगिक विस्तारातील सहभाग लक्षात घेता जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची आवश्यकता होती."


जूनपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पहिले वर्ष सुरु होणार?


दुसरीकडे, कोल्हापुरातील (Kolhapur) शासकीय तंत्रनिकेतनच्या जागेत नवे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यासाठी सुविधांची पाहणी शासकीय विभागीय समितीने ऑक्टोबर 2022 मध्ये केली होती. याठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यासाठी सकारात्मक अहवाल राज्य सरकारला सादर केला. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याने नव्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जूनपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पहिले वर्ष सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या