Ambabai Mandir : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांचा पदभार तडकाफडकी काढून घेतल्याने कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सचिवपदाचा पदभार स्वीकारल्यापासून शिवराज नाईकवाडे अत्यंत तळमळीने काम करत असल्याची चर्चा होती. त्यांच्या कामाचे कोल्हापूरमध्ये कौतुक झालं असताना अचानक असा पदभार का काढून घेण्यात आला? यावरून चर्चेला उधाण आले आहे. नवीन जबाबदारी राधानगरीचे प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीच्या स्थितीवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या संदर्भात राज्य आणि केंद्राच्या पुरातत्त्व विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. याच प्रकरणावरून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात श्री पुजकांकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर सचिवांचा पदभार तडकाफडकी काढून घेत अंबाबाई मंदिरातील मुळ मुद्यांकडे दुर्लक्ष करण्याचा डोळेझाक करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.
माध्यमांना अंबाबाई मंदिरात मनाई
मूर्तीच्या स्थितीवरून माध्यमांनी लक्ष वेधल्यानंतर राज्य पुरातत्त्व विभागाकडून 28 फेब्रुवारी रोजी पाहणी केली होती. ही पाहणी पार पडल्यानंतर केंद्रीय पुरातत्त्व विभागाने पाहणी केली आहे. विभागाने मूर्ती सद्यस्थितीत सुस्थितीमध्ये असल्याचा निर्वाळा दिला आहे. मात्र, श्री पुजकांनी न्यायालयात मूर्तीशी छेढछाड झाल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात त्यांनी दोन छायाचित्रे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहेत. श्रीपूजकांच्या वकिलांनी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने छेडछाड केल्याचा गंभीर आरोप केला होता. कोणत्याही परवानगीशिवाय चेहऱ्यावर यापूर्वी लावलेला लेपचा काही थर काढून टाकला. लेपचा काही थर काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचे समोर आले होते.
दुसरीकडे, अंबाबाई मंदिरात वार्तांकनासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना कॅमेरा घेऊन बंदी करण्यात आली आहे. काल (17 मार्च) अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वारावरच माध्यमांना अडवण्यात आलं. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तसा आदेश काढल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सांगितले. TRP साठी बातम्या दाखवल्या जात असल्याचा अजब आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकारी राजेश्वरी, शिवन्नाकुमार, राम निगम, उत्तम कांबळे यांनी मंदिरात मूर्तीची मंगळवारी पाहणी केली आहे. या संदर्भातील केंद्रीय पुरातत्त्व विभाग लवकरच अहवाल सादर करणार आहे, या अहवालानंतर संवर्धनासंदर्भात पुढील निर्णय होणार आहे. मूर्ती सुरक्षित असून काही प्रमाणात संवर्धनाची गरज भासल्यास त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातील, अशी माहिती केंद्रीय पुरातत्त्व विभागाने दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या