Rajendra patil yadravkar vs shivsena : जयसिंगपूरमध्ये बंडखोर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये काल अभूतपूर्व राडा झाला होता. यावेळी पोलिसांना या दोन्ही मोर्चेकऱ्यांना सांभाळताना बरीच कसरत करावी लागली. दोन्ही गटाकडून एकमेकांवर धावून जाण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी राखलेल्या प्रसंगधावनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, पोलिस आता ॲक्शनमध्ये आले आहेत. पोलिसांनी दोन्ही गटातील मिळून सुमारे 200 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
परवानगीविना बेकायदेशीर जमाव जमविणे, घोषणाबाजी करून मोर्चा काढणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे या आरोपांखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर यड्रावकर गटाकडून जयसिंगपूरचे माजी उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचाही समावेश आहे.
काल पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये चांगली धक्काबुक्की झाली. यावेळी आम्ही यड्रावकर म्हणत शेकडो समर्थक राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयासमोर जमले होते. यड्रावकर यांनी शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. शिवसैनिकांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये चांगलीच झटापट झाली. त्यामुळे मोठा राडा झाला होता.
मी लेचापेचा नाही, राजेंद्र पाटील यड्रावकरांचा इशारा
या राड्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्हाट्सअॅप व्हिडिओ काॅलच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना येणाऱ्या काळात अपक्ष म्हणूनच भूमिका राहणार असल्याचे सांगितले. विकासासोबत राहणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे यांनी विकासकामासाठी मदत केली आहे, त्यांच्या पाठीशी राहणं आपलं कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याची भूमिका बरोबरच असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, की अडीच वर्षांमध्ये तालुक्यात कोट्यवधींची काम झाली आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावात किमान एक कोटी मिळाले असल्याने इतिहासात हे पहिल्यांदा घडलं आहे. विकासाची गती कायम ठेवायची असेल, तर एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या