Rajendra Patil Yadravkar : बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय संघर्ष चांगलाच उफाळून आला आहे. आज जयसिंगपूरमध्ये बंडखोर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या समर्थनार्थ एकवटले होते. यावेळी शिवसेनेकडूनही यड्रावकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये चांगलाच राडा झाला. शिवसैनिकांनी पोलिसांनी रोखल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
दरम्यान, या राड्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्हाट्सअॅप व्हिडिओ काॅलच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना येणाऱ्या काळात अपक्ष म्हणूनच भूमिका राहणार असल्याचे सांगितले. विकासासोबत राहणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे यांनी विकासकामासाठी मदत केली आहे, त्यांच्या पाठीशी राहणं आपलं कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याची भूमिका बरोबरच असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, की अडीच वर्षांमध्ये तालुक्यात कोट्यवधींची काम झाली आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावात किमान एक कोटी मिळाले असल्याने इतिहासात हे पहिल्यांदा घडलं आहे. विकासाची गती कायम ठेवायची असेल, तर एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे.
काही लोकांना काही भांडवल नसल्याने अफवा पसरवल्या जात आहेत. आज काहींनी मोर्चा काढला, पण आम्ही अपक्ष निवडून आलो आहे. ज्यांनी विरोधात मतदान केलं त्यांनी मोर्चा काढणं म्हणजे हास्यास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या