कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिंदे गटाला समर्थन देत बंडखोरी केल्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कट्टर शिवसैनिक विरुद्ध बंडखोर समर्थक अशा राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे. 


आज जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे समर्थक त्यांच्या कार्यालयासमोर एकवटल्यानंतर आता शिवसैनिकही मोर्चा येऊन धडकले आहेत. यावेळी पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. तुम्हाला मंत्रिपद देऊनही तुम्ही बंडखोरी का केली ? अशी विचारणा शिवसैनिकांनी राजेंद्र पाटील यड्रावकरांना करत आहेत. शिवसैनिकांनी यावेळी यड्रावकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 


त्यामुळे जयसिंगपूर मध्ये आजा राजकीय आखाडा निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. पोलिसांकडूनही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, बंदोबस्त भेदून शिवसैनिकांनी राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या कार्यालयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला.  ज्या ठिकाणी शिवसैनिक आणि पोलिस आमनेसामने आले आहेत त्या ठिकाणापासून यड्रावकरांचे कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. 


अनुचित प्रकार घडू शकतो म्हणून पोलीस आगोदर सावध झाले आहेत. राजेंद्र पाटील-यड्रावकर अपक्ष आमदार असले तरी, त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता आणि त्यांना त्याच पाठिंब्याच्या जोरावर आरोग्य राज्यमंत्री पद मिळाले. मात्र, त्यांनी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. 


त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यांनी आता रस्त्यावर उतरून यड्रावकर यांच्यासह  राजेश क्षीरसागर आणि प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात एल्गार सुरू केला आहे. कोल्हापूर मध्येही मोर्चा काढण्यात आला होता. त्या ठिकाणी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले होते.


इतर महत्त्वाच्या बातम्या