Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील पोवाचीवाडी गावामध्ये गावच्या पोलीस पाटलांचाच गावातील चार जणांनी पूर्ववैमनस्यातून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादात पोलिस तक्रारीमध्ये नाव घातल्याच्या रागात कोयता आणि खुरप्याने सपासप वार करुन पोलिस पाटील संदीप ज्ञानदेव पाटील (वय 41) यांचा चार जणांनी खून केला. शनिवारी रात्री ही घटना उघडकीस आली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पोलिस पाटील संदीप यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील मुलगा व मुलगी असा परिवार आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतातील वादावरून देवाची रांगी नावाच्या शेतात शनिवारी संशयित आरोपी रोहित पाटीलशी वाद झाल्यानंतर त्याला समजावून सांगण्यासाठी सुरेश गुरव यांनी फोन करून पोलिस पाटील संदीप यांना बोलावून घेतले होते. यानंतर पोलिस पाटील संदीप गुरव यांच्या देवाचे रांगी नावाच्या शेतात गेले. यावेळी रोहित पाटील, निवृत्ती राजाराम पाटील, अरुण राजाराम पाटील व योगेश अरुण पाटील (सर्व रा. पोहाचीवाडी) यांनी पूर्ववैमनस्यातून पोलिस तक्रारीत नाव घातल्याचा रागातून पोलिस पाटील यांच्यावर कोयता, खुरप्याने हातावर, डोक्यात मानेवर सपासप वार केले.  यात संदीप यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. 


संशयित रोहित व शांताराम आप्पा गावडा (रा. देवकांडगाव, ता. आजरा) यांच्या तीन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. यामध्ये रोहित व भावकीतील काही जणांविरोधात चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. यामध्ये पोलिस पाटील संदीप यांनी तक्रारीमध्ये नाव घातल्याचा राग होता. त्या रागातून हा खून झाल्याचे समोर येत आहे. 


पोलिस ठाण्यासमोरच भरदिवसा कोयता, कटर, ब्लेडने तरुणाच्या पाठीत वार


दरम्यान, आठवडाभरापूर्वी भरदिवसा थेट पोलिस ठाण्यासमोर तरुणावर कोयता, कटर, ब्लेडने तरुणाच्या पाठीत वार केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील  इचलकरंजी शहरात घडली. आजीला मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी जात असलेल्या तरुणावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोरच प्राणघातक हल्ला करण्यात आला. अभिषेक बजरंग खांडेकर (वय 21) हा गंभीर जखमी झाला आहे. विमल प्रकाश पाटील (वय 65) याही जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी झालेल्या अभिषेकवर इचलकरंजीमधील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रावसाहेब गोसावी, उमाजी गोसावी आणि अजय जुवे (रा. गोसावी गल्ली) यासह चौघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या