कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) गेल्या काही महिन्यांपासून अगदी घराघरात चर्चेचा विषय झालेल्या कागल (Kagal) तालुक्यातील बिद्री साखर कारखान्याच्या (Bidri Sakhar Karkhana) निवडणुकीचा निकाल उद्या (5 डिसेंबर) जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्या पाच डिसेंबर रोजी कोल्हापुरातील (Kolhapur Bidri Karkhana Nikal) मुस्कान लाॅनला मतमोजणी होणार आहे. सत्ताधारी गटाचे चिन्ह विमान व विरोधी गटाचे चिन्ह कप बशी आहे. 


बिद्री कारखान्यासाठी अत्यंत चुरशीने मतदान (Bidri Sakhar Karkhana Nikal) 


दरम्यान, बिद्री साखर कारखान्यासाठी (Bidri Sakhar Karkhana) रविवारी 89.3 टक्के मतदान झालं. 56,091 मतदारांपैकी 49 हजार 940 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता मतदान शांततेत पार पडले. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 173 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं. दोन्ही आघाडीचे 50 उमेदवार, शेतकरी संघटनेचे दोन व अपक्ष चार अशा 56 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झालं आहे. सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडी असा दुरंगी सामना या निवडणुकीसाठी रंगला आहे. या निवडणुकीमुळे आगामी विधानसभेसाठी सुद्धा बरंच चित्र स्पष्ट होणार असल्याने नेमकं या निवडणुकीमध्ये कोण लै भारी ठरणार? आणि कोणाचा कंडका पडणार? याचं उत्तर सुद्धा अवघ्या काही तासांमध्ये मिळणार आहे. या निवडणुकीसाठी कधी नव्हे ती चुरस यावेळी निर्माण झाली आहे. रविवारी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. एक एक मतासाठी नेते घरोघरी फिरताना दिसून आले. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी निश्चितच नसेल हे सुद्धा स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीसाठी तब्बल सात साखर सम्राट प्रतिष्ठा पणाला लावून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत.


बिद्रीच्या फडात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उडाल्या. त्याचबरोबर राजकीय चिखलपेक सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे निवडणूक वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहोचली. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी के. पी. पाटील यांना तगडे आव्हान निर्माण झाले आहे. त्यांचे मेहुणे फुटून विरोधी आघाडीत सामील झाल्याने चुरस आणखी वाढली आहे. 


विधानसभेची रंगीत तालीम (Bidri Sakhar Karkhana Nikal) 


दोन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, दोन आमदार, पाच माजी आमदार, दोन जिल्हाध्यक्ष, गोकुळ अध्यक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी पूर्णतः विधानसभेची रंगीत तालीम एक प्रकारे पार पडली आहे. या कारखान्याचे कार्यक्षेत्र कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर अशा चार तालुक्यांमध्ये आहे. त्यामुळे विधानसभेची पेरणी करण्यासाठी सर्वच नेत्यांकडून मोठी ताकद पणाला लावण्यात आली. 


दुसरीकडे, दोन्ही आघाडीमधील नेते व उमेदवारांनी विविध गावात मतदान केंद्रावर मतदान केले. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, ‘शाहू’ कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ‘बिद्री’चे संचालक बाबासाहेब पाटील, सुनील सुर्यवंशी, उमेदवार जयवंत पाटील, ‘गोकूळ’चे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, तंबाखु संघाचे संजय पाटील यांनी संस्था गटातून बिद्री येथील केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावला. विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील यांनी (मुदाळ), आमदार प्रकाश आबिटकर (गारगोटी), उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे (सरवडे), नविद मुश्रीफ (बोरवडे), अर्जुन आबिटकर (गारगोटी), गणपतराव फराकटे (बोरवडे), प्रविणसिंह व रणजितसिंह पाटील (मुरगूड) यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांनी व दोन्ही आघाड्यांतील उमेदवारांनी मतदान केले. 


इतर महत्वाच्या बातम्या