Bhattarak Charukirti Mahaswamiji : श्रवणबेळगोळमधील (Shravanbelgol) जैन मठाचे चारूकीर्ती भट्टारक स्वामी यांचे गुरुवारी (23 मार्च) देहावसन झाले. वयाच्या 21व्या वर्षी ते भट्टारक पीठावर विराजमान झाले होते. महास्वामींचा जन्म कर्नाटकातील वरंग येथे 3 मे 1949 रोजी रत्नवर्मा म्हणून झाला. त्यांनी विसाव्या वर्षी दीक्षा घेतल्यानंतर एकविसाव्या वर्षी ते भटारक पदावर विराजमान झाले. श्रवणबेळगोळ येथे गुरुवारी अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी कर्नाटक, महाराष्ट्रासह देशभरातील शिष्यगण तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. 2019 मध्ये आलेल्या प्रलयकारी महापुरामध्ये त्यांनी सांगली, कोल्हापूर, बेळगाव, बागलकोट या जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त भागाला भेटी देऊन सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव या जिल्ह्यांना प्रत्येकी 35 लाखांचा मदतनिधी दिला होता.


महास्वामींचा लहानपणापासून कल जैन तत्वज्ञानाकडे होता. त्यांनी प्राकृत, संस्कृत आणि कन्नड भाषेतून जैन तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता. तत्त्वज्ञान आणि इतिहास विषयातून त्यांनी म्हैसूर आणि मंगळूर विद्यापीठातून एम. ए. केले होते. याबरोबरच इंग्रजी आणि हिंदी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते. 12 डिसेंबर 1969 रोजी ते श्रवणबेळगोळ पीठाच्या धर्माचार्य पीठावर आरोहण झाले. श्रवणबेळगोळ भट्टारक पिठाचा इतिहास प्राचीन आहे. 


श्रवणबेळगोळ येथील भगवान गोमटेश्वरांच्या मूर्तीचा महामस्तकाभिषेक आयोजित करण्यात महास्वामीजींचे मोठे योगदान राहिले. महास्वामाजी यांनी भट्टारक पिठाचे पुनरुज्जीवन केले. त्यानंतर हे पद आणि भट्टारक महास्वामी हे सातत्याने जैन समाजाला मार्गदर्शन करत राहिले. भट्टारक म्हणून आपल्या 53 वर्षांच्या कार्यकाळात चारवेळा महामस्तकाभिषेकाचे नेतृत्व केले. तसेच शाळा, अभियांत्रिकी कॉलेज, पॉलीटेक्निक महाविद्यालय, दोन रुग्णालय तसेच प्राकृत भाषेच्या संवर्धनासाठी विद्यापीठ स्थापन केले. भक्तनिवास तसेच भोजन शाळाही निर्माण केल्या. 


इतर महत्वाच्या बातम्या