Rahibai Soma Popere : बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. व्ही. टी. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा भद्रकाली ताराराणी पुरस्कार जाहीर झाला आहे. 51 हजार रूपये, शाल, श्रीफळ, गौरवपत्र, भद्रकाली ताराराणीचे स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मंगळवारी 17 जानेवारी रोजी डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतीभवनात सकाळी 11 वाजता पुरस्कार वितरण होईल. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी दिली आहे. 


डॉ. पाटील म्हणाले,‘डॉ. व्ही. टी. पाटील यांच्या 90 व्या वाढदिवशी शिक्षक व सेवकांतर्फे कृतज्ञतापूर्वक दिलेल्या गौरव निधीतून हा पुरस्कार दिला जातो. राहीबाई यांनी आपल्या परसबागेत देशी वाणांच्या फळभाज्या, कडधान्ये, तृणधान्ये यांची लागवड केली. याद्वारे 52 पिकांचे 154 वाण त्यांनी तयार केले आहेत.त्यांच्या या कार्याचा गौरव यानिमित्ताने होणार आहे.  


राहीबाई पोपेरे यांच्या कामाची दखल 


दरम्यान, महाराष्ट्रात बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता' राहीबाई पोपेरे यांच्या कामाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. त्यांना नारीशक्ती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. कृषी क्षेत्रात वैविध्यपूर्ण प्रयोगासाठी 'नारी शक्ती' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कठीण परिस्थितीत केलेल्या कामाबद्दल आणि त्यांच्या संघर्षाबद्दल त्यांनी 'माझा कट्टा'वर व्यथा मांडल्यानंतर त्यांच्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले होते. 


आदिवासी दुर्गम भागात बियाणांची बँक चालवणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्या कामाचे कौतुक अनेकांनी केलं आहे. 100 हून अधिक देशी बियाणांचं जतन करणाऱ्या बीजमाता अर्थात राहीबाई पोपरे यांना घर देखील नव्हतं. एबीपी माझाच्या बातमीनंतर चंद्रकांत पाटील यांनी राहीबाई पोपरेंना नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातकोंबळणे गावात पक्क घर बांधून दिलं होतं. 


राहीबाई पोपेरेंचं भाषण अर्ध्यावर थांबवलं


दरम्यान, 'बीजमाता' राहीबाई पोपेरे यांना महिला विज्ञान काँग्रेसच्या शुभारंभ सत्रात अचानक भाषण आटोपते घेण्यास सांगण्यात आले होते. राहीबाईंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काही नेत्यांवर टीका केल्यानंतर राहीबाई पोपेरे यांना थांबवण्यात आलं होतं. त्यांनी आपल्या गावी भेट देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या वचनाची आठवण पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेले असताना करुन दिली. अहमदनगर जिल्ह्यातील कोंभळणे गावातील गरीब परिस्थितीची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली होती, असं राहीबाईंनी म्हटले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या