Kolhapur News : पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी, प्राणी तसेच मानवास दुखापत होते. तसेच पर्यावरणाची हानी होते. जिल्ह्यात कोणीही नायलॉन मांजाची खरेदी अथवा विक्री करु नये, नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नायलॉन मांजा खरेदी, विक्री, वापरावर निर्बंध घालण्याबाबत बैठक घेण्यात आली, यावेळी तहसीलदार संतोष कणसे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


मकर संक्रांत सणादरम्यान मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले जातात. पतंगासाठी नायलॉन मांजाचा वापर होण्याची शक्यता आहे. तथापी, नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी आणि मानवास होणारी इजा, तसेच पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी नागरिकांनी नायलॉन मांजाची खरेदी करु नये, असे आवाहन शिंदे यांनी केले.  नायलॉन मांजा विक्री होत नसल्याची खात्री करण्यासाठी पथके स्थापन करुन दुकानांची तपासणी करा, मांजा आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करा, अशा मांजाच्या खरेदी, विक्री, वापर व वाहतूकीवर निर्बंध आणा. शाळा, महाविद्यालये तसेच नागरिकांमध्ये याबाबत जाणीवजागृती करा, अशा सूचना त्यांनी केल्या.


नायलॉन मांजाविरोधात राज्यभर कारवाई 


उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर संपूर्ण महाराष्ट्रात नायलॉन मांजाची विक्री आणि साठा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी गुरुवारी एक आदेश जारी करून नायलॉन वापर, विक्री आणि साठवणूक करण्यास बंदी घातली आहे. पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या नायलॉनला बळकट करण्यासाठी त्यावर काही वेळा काचेची पावडर टाकली जाते, त्यामुळे पक्षी गंभीर जखमी होतात. अनेक घटनांमध्ये जिवितहानी झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.


गेल्या चार दिवसांपासून नाशिक (Nashik) पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात थेट तडीपाडीची कारवाईची सुरू केली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये जवळपास 16 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना 144 कलम अंतर्गत नोटीसी बजावली जात आहे. या संशयिताकडून पुन्हा नायलॉन मांजा विक्री होऊ नये, याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली असून यामध्ये सरकार वाडा, पंचवटी, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या 16 विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. 


औरंगाबाद शहर पोलिसांकडून सूचना 


नायलॉन मांजाबाबत औरंगाबाद शहर पोलिसांकडून नागरिकांसाठी काही सूचना करण्यात आल्या असून, नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. नायलॉन मांजा दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या