कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) देशात भाजप विरोधात वातावरण झपाट्याने होत असल्याने पीएम मोदी (PM Modi) यांची घबराट होत आहे. म्हणून त्यांना मुस्लिम विरोधात बोललो, तर हिंदू एक होतील असं वाटतं, पण असं होणार नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. थोरात यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना पीएम मोदी यांच्या भाषणांवरून जोरदार टीका केली. मोदी महागाई, बेरोजगारीवर बोलत नसल्याचे ते म्हणाले.
बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, देशात भाजपाविरोधात वातावरण असल्याने इंडिया आघाडीचा मोठा विजय होईल. महाविकास आघाडीने लोकांचं नातं जपलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वागणं देशाच्या संविधान विरोधात असल्याचे ते म्हणाले. भाजपची पातळी आणखी खाली जात असल्याची टीका त्यांनी केली.
अशी भाषा पंतप्रधान पदाला शोभणारी नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार केलेल्या वक्तव्यावरूनही थोरात यांनी सडकून टीका केली. शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य महाराष्ट्राचे जनता मताच्या रूपाने फिरवेल, असे त्यांनी सांगितले. अशी भाषा पंतप्रधान पदाला शोभणारी नाही, सत्ता जात असल्याचे समोर येत असल्याने अशी वक्तव्य समोर येत आहेत. महाविकास आघाडीचे चाळीस पार झालेले तुम्हाला दिसतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी इच्छुकांमधील नाराजी केवळ काँग्रेसमध्ये नसून सर्वच पक्षांमध्ये असते, असे सांगितले. अनेकांचे उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीत. नाराजी असते, पण त्यावर मार्ग काढावा लागतो असेही ते म्हणाले.
सुप्रियाताई तीन ते साडेतीन लाख मताधिक्याने निवडून येतील
दुसरीकडे, बारामतीतून सुप्रियाताई तीन ते साडेतीन लाख मताधिक्याने निवडून येतील, असा दावाही थोरात यांनी केला. शरद पवार साहेब खूप शांत पद्धतीने संकट हाताळतात, पक्ष वेगळे असले तर मी त्यांना खूप जवळून पाहिले आहे. संकटाला कसं सामोरं जायचं आणि त्यातून कसं बाहेर पडायचं हे त्यांचं वैशिष्ट्य असल्याचे कौतुकही त्यांनी केले.
इतर महत्वाच्या बातम्या