Kolhapur Airport : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूर विमानतळाला नाईट लँडिगची परवानगी मिळाल्याने जिल्ह्याच्या आणि पर्यायाने विमानतळ विकास प्रक्रियेमध्ये मैलाचा दगड ठरणार आहे. या निर्णयाने विमानतळ 24 तास सुरु राहिलचं, पण बोईंग, एअर बस सारखी मोठी विमाने उतरण्याचा मार्ग मोकळा होईल. कोल्हापूरमधील विमानतळाचे 1939 मध्ये लोकार्पण झाल्यापासून तेथील सोयीसुविधांसाठी आजतागायत संघर्ष सुरु आहे.
कोणत्याही शहराच्या तसेच उद्योग विकासात पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. ज्या जितक्या सक्षम आणि प्रभावी असतात तेवढा प्रगतीचा मार्ग अधिक प्रशस्त होत असतो. रस्ते, पाणी, वीज, महामार्ग, रेल्वेमार्ग, विमान प्रवास, जल वाहतूक हे शहराच्या विकासाचे प्रमुख अंग आहेत अगदी त्याचप्रमाणे उद्योगाचे सुद्धा आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चार केंद्रीय मंत्र्यांना कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा नसल्याने दिल्लीतून लवकर रवाना व्हावे लागले होते. त्याचवेळी या सुविधेचे महत्त्व अधोरेखित झाले होते. त्यानंतर दोनच दिवसात नाईट लँडिंग आणि विस्तारित धावपट्टीला मंजूरी मिळाल्याने जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे.
भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे महत्त्व लक्षात घेतल्यास कोल्हापूर कोकण आणि दक्षिणेचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या विमानतळाचे महत्त्व अधोरेखित होते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आता विमानतळावर झालेल्या नाईट लँडिग सुविधेनंतर आता जिल्ह्यामध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे.
धनंजय महाडिकांकडून शिंदे सरकारला श्रेय
खासदार धनंजय महाडिक यांनी नाईट लँडिंग आणि विस्तारित धावपट्टीला परवानगी मिळाल्यानंतर शिंदे सरकारचे आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले. ते म्हणाले की, कोल्हापूर विमानतळावरील अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या नाईट लँडिंग सुविधेसह धावपट्टी विस्तारीकरणासाठी मंजुरी मिळाली आहे. यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मला या कामी नागरी विमान उड्डाण मंत्री जोतिरादित्य शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचे सहकार्य लाभले यासाठी अभिनंदन व मनःपूर्वक धन्यवाद देतो.
सतेज पाटलांनी श्रेय सर्वांना दिले, पण महाडिकांचा उल्लेख टाळला!
आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर विमानतळावर लँडिंगला परवानगी मिळाल्यानंतर याचे श्रेय संजय मंडलिक, धैर्यशील माने, संभाजीराजे आणि आपण स्वत: केलेल्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे म्हटले आहे. त्यांनी कट्टर राजकीय विरोधक धनंजय महाडिक श्रेय नामावलीत समावेश केला नाही. कोरोनासारख्या प्रतिकूल परिस्थितीतही पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये गेल्यानंतर वेळोवेळी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंद यांची आणि विमानतळ प्राधिकरणाची भेट घेतली होती. सर्वांचे सहकार्य तसेच माझ्या सततच्या पाठपुराव्याने नाईट लँडिंग आणि विस्तारित धावपट्टीचा मुद्दा मार्गी आल्याने आनंद झाल्याचे पाटील म्हणाले.
धनंजय महाडिक खासदार होताच संजय मंडलिकांचा खोचक टोला
गेल्या महिन्यात धनंजय महाडिक भाजपकडून राज्यसभेवर गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तत्कालिन शिवसेना खासदार आणि आता बंडखोरी शिंदे गटात गेलेल्या संजय मंडलिक यांनी खोचक टोला लगावला होता. मंडलिक यांनी कागलमध्ये बोलताना म्हटले होते की, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विकामकामे पूर्णत्वास लावली असून विमानतळावरील विस्तारित धावपट्टीचा प्रश्न मार्गी लावला आहे. विमानतळासाठी 250 कोटी मंजूर झाले असून त्यामधील 52 कोटींचा खर्च झाला आहे. त्यामुळे नवीन खासदार हे मीच केले म्हणून सांगतील, म्हणून उल्लेख करत असल्याचे सांगत महाडिकांना टोला लगावला होता.
कोल्हापूरच्या उद्योजकांकडूनही पाठपुरावा
कोल्हापुरातील उद्योजकांनी सुद्धा देशासह जगाच्या पाठीवर सहजपणे संचार करता यावा यासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या माध्यमातून रेल्वेमार्ग, विमानतळ विकास तसेच वाहतूक, औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सातत्याने लढा दिला आहे.
राजाराम महाराजांनी केला होता पहिल्या विमानातून प्रवास
5 जानेवारी 1939 रोजी कोल्हापूर विमानतळ सुरू होऊन येथून पहिल्या विमानाने मुंबईकडे उड्डाण केले. छत्रपती राजाराम महाराज यांच्या दूरदृष्टीतून हा विमानतळ पूर्ण करण्यात आला आणि विमान वाहतूकही सुरू करण्यात आली. स्वतः छत्रपती राजाराम महाराज यांनीही पहिल्या विमानातून प्रवास केला होता.
कोल्हापूर विमानतळाची सद्यस्थिती काय आहेय?
कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर-हैदराबाद दोन, कोल्हापूर-तिरुपती एक, तर कोल्हापूर-अहमदाबाद मार्गावर आठवड्यातून तीनवेळा सेवा सुरु आहे. कोल्हापूर-मुंबई आणि कोल्हापूर-बंगळूर सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
टर्मिनस इमारतीसाठी 74 कोटींचा निधी
विमानतळावर सध्या टर्मिनस इमारतीचे काम सुरु असून त्यासाठी 74 कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. पुढील सहा ते सात महिन्यात काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. टर्मिनस इमारतीमध्ये 10 चेक इन काऊंटर, 8 सुरक्षा तपासणी कक्ष, 2 बॅगेज क्लेम कॅरुजल, 2 व्हीआयपी लाऊंज तसेच 110 कार पार्किंगची सुविधा असेल. गेल्या तीन वर्षात कोल्हापूर विमानतळावरून साडे तीन लाख प्रवाशांचा टप्पा पार पडला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या