Rajesh Kshirsagar : एकनाथ शिंदे शिवसेना फोडून स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पडले आहे. आमदार प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर हे बंडखोर शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यानंतर खासदारांनी केलेल्या बंडाळीनंतर संजय मंडलिक आणि धैर्यशील माने सुद्धा शिंदे कळपात सामील झाले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात नेत्यांची बंडखोरी आणि रस्त्यावरील निष्ठावंत शिवसैनिक एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, राजेश क्षीरसागर यांनी बंडखोरी केल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. इतकंच नाही, तर नवाब मलिक आणि दाऊद प्रकरणावरून बोलता येत नव्हते, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, त्यांची मुळ खदखद आता बाहेर पडली आहे. पोटनिवडणुकीला त्याग करूनही माझी राज्यसभेला आठवण झाली नाही, असे म्हणत संजय पवार यांना उमेदवारीला आपला कडाडून विरोध होता हे आता त्यांनी अप्रत्यक्षरित्या जाहीरपणे सांगून टाकले आहे. ज्यांची जनतेतून निवडून यायची लायकी नाही त्यांनीच पक्ष संपवल्याची टीका त्यांनी केली.
आज उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला होता. त्यांना आता शिवसेनाप्रमुख व्हायचं असल्याची टीका केली होती. यावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही शिवसेना प्रमुखांना सोडलं नाही आणि सोडणार नसल्याचे ते म्हणाले.
पक्ष कसा चालवावा हे शरद पवार यांच्याकडून शिकावं
राजेश क्षीरसागर यांनी पक्ष कसा चालवावा हे शरद पवारांकडून शिकावे, असे सांगत उद्धव ठाकरे यांना उपदेशाचे धडे दिले. देव मंदिरात राहिला पाहिजे हे म्हणत होतो, पण देवाला बाहेर काढलं आणि टीका होऊ लागली हे आता त्यांनीच मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. महाआघाडी लोकांना पटली नव्हती याचा अनुभव आम्हाला येत होता, नवाब मलिक यांचे दाऊदशी संबध असे अनेक मुद्दे असतानाही बोलता येत नव्हते. कसलं हिंदुत्व आमचं राहील होत? ही गद्दारी नाही, क्रांती आहे. शिवसेना दुसऱ्याच्या हातात जात होती म्हणून ही क्रांती केल्याचे ते म्हणाले.
दर 15 वर्षांनी ही परिस्थिती का येते याचा विचार वरिष्ठांनी केला पाहिजे. जे काय घडलंय त्याला मान्यता द्यावी. उद्धव ठाकरे व्यक्ती म्हणून वाईट नाहीत पण काही नेते कानात सांगतात असा दावाही त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या
- CPR Hospital Kolhapur : सीपीआरमधील शवविच्छेदन विभागातील फ्रिजर 6 दिवसांपासून बंद, मृतदेह सडल्याने संतापाची लाट
- Dhairyasheel Mane : उद्धव ठाकरेंनी लोकसभेत पाठवलं, प्रवक्ते पद दिलं, पुत्रवत प्रेम दिलं, विजयासाठी रान केलं, मग धैर्यशील माने सांगा शिवसैनिकांचं काय चुकलं?
- Kolhapur News : हुपरी पोलिस ठाण्यातील विशाल चौगुले यांचा मनाला चटका लावणारा मृत्यू