कोल्हापूर: राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या मुलाने अलीकडेच कोल्हापूरमध्ये त्यांच्या शेजाऱ्यांना मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. राजेश क्षीरसागर यांच्या गच्चीत त्यांचे कार्यकर्ते रात्रभर पार्ट्या करतात. यावेळी मोठ्याने आवाज सुरु असतो. याबद्दल क्षीरसागर यांच्या शेजारी राहणाऱ्या वरपे कुटुंबीयांनी आक्षेप घेतला असता त्यांना राजेश क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा ऋतूराज या दोघांनी राजेंद्र वरपे आणि त्यांच्या १५ वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केली होती. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असता त्यांच्याकडून गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोपही वरपे कुटुंबीयांनी केला होता.


याप्रकरणी आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना फैलावर घेतले. अंबादास दानवे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित (Kolhapur SP Mahendra Pandit) यांना झापले. यावेळी त्यांनी पोलिसांची खरडपट्टी काढली. दबावाखाली पोलीस अधिकारी वरपे कुटुंबीयांची तक्रार नोंदवून घेत नसून, राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करत नाहीत, असा आरोप करत, अंबादास दानवे यांनी केला. याबाबत दानवे यांनी थेट महेंद्र पंडित यांना फोन करुन जाब विचारला. 'एसपी साहेब तुमची आणि क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही', असा दम अंबादास दानवे यांनी महेंद्र पंडित यांना भरला. त्यामुळे आता याप्रकरणात पोलीस काही कारवाई करणार का, हे पाहावे लागेल. तसेच राजेश क्षीरसागर यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


नेमकं प्रकरण काय?


डिसेंबर महिन्यात राजेश क्षीरसागर आणि वरपे कुटुंबीयांमध्ये वाद झाला होता. क्षीरसागर यांच्या गच्चीत कार्यकर्त्यांच्या पार्ट्या सुरु असतात. त्यामुळे रात्रभर जोरजोरात आवाज सुरु असतो. यावरुन राजेंद्र वरपे त्यांना समजवायला गेले तेव्हा क्षीरसागर आणि त्यांच्या मुलाने वरपेंना मारहाण केली होती. यासंदर्भात वरपे यांच्या मुलीने एका व्हिडीओच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपली फिर्याद मांडली होती. मुख्यमंत्री साहेब, तुमचे जवळचे सहकारी राजेश क्षीरसागर हे आम्हाला वारंवार त्रास देत आहेत. त्यांना आमचे घरे हवे असल्याने त्यांचा त्रास वाढतच चालला आहे. तुम्ही आम्हाला तुमचं घर विका आणि इथून निघून जा, असंही वारंवार सांगण्यात येत आहे. क्षीरसागर आणि त्यांचे कार्यकर्ते हे रात्री उशीरापर्यंत त्यांच्या घरातील टेरेसवर पार्टी करत असतात. आवाज कमी करा, असे माझे वडील सांगायला गेले, तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच ही घटना घडली. रात्री साडेबारापर्यंत त्यांची पार्टी, मोठमोठ्याने आवाज सुरू होते, तेव्हा माझे वडील त्यांना समजवायला गेले, तेव्हा राजेश क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा ऋतूराज या दोघांनी माझ्या वडिलांना आणि माझ्या १५ वर्षांच्या लहान भावाला बेदम मारहाण केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे आम्ही यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करायला गेलो, तेव्हा कोणीच आमचं ऐकून घेतलं नाही, कोणीच फिर्याद लिहून घेतली. त्यानंतर दोन दिवसांनी क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी आमच्या घराबाहेर असलेले कॅमेरे फोडून अतोनात नुकसान केलं, असे वरपे यांच्या मुलीने व्हीडिओत म्हटले होते.


 


आणखी वाचा


कोल्हापुरात घरात जाऊन मारामारी करणारं एक कॅरेक्टर, पण हा थोड्या दिवसांचा खेळ, सरकार बदलणार; आदित्य ठाकरेंचा राजेश क्षीरसागरांना टोला