Almatti Dam Height : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून कर्नाटककडून सुतोवाच करण्यात आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात रणंकदन सुरु झाले आहे. विशेष करून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून धरणाची उंची वाढवण्यास कडाडून विरोध आहे. धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय झाल्यास कोल्हापूर आणि सांगली बंद ठेवण्याचा इशारा सर्वपक्षीय कृती समितीने दिला आहे.
सांगली मनपाच्या 19 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सभेत अलमट्टी उंची वाढीला विरोध करण्यासाठी ठराव मागणीचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुरसदृश्य स्थिती होते. त्यामुळे सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करण्यात येणार आहे. तसेच दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच सांगलीच्या पालकमंत्र्यांची भेट घेऊन केंद्र आणि सर्वोच्च न्यायालयात विरोधाची भूमिका मांडावी, यासाठीही निवेदन दिलं जाणार आहे.
एकसंध होऊन लढा उभा करण्याची गरज
अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कृष्णा नदीपात्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर फुगवटा निर्माण होऊन कृष्णा नदीकाठावरील गावांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. गावे, शेती पर्यायाने सारे जीवनच उद्धस्त होण्याची भीती आहे. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय सध्या गत्यंतर नाही. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कर्नाटक राज्यातील अनेक गावे कायमची संकटात सापडणार आहेत. 2005, 2019, 2021 या सालात अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यावेळी आलेल्या महाप्रलंयकारी महापुराचे नुकसान पाहता संपूर्ण शिरोळ तालुक्यासह सांगली - कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक गावांचे पुनर्वसन करावे लागले होते.
महाराष्ट्रातील कोयना, पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा या नद्यांचे पाणी कृष्णेद्वारे अलमट्टीलाच मिळते. अतिवृष्टीत जर तेथे पूर्ण क्षमतेने पाणी अडविले गेले, तर या सर्व नद्यांना पुन्हा महाभयंकर पूर येऊ शकतो. या अगोदरही कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी अलमट्टीची उंची वाढविण्याचे जाहीर केले होते, मात्र कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जनतेने रस्त्यावर उतरूनआंदोलन केले. आताही काही संघटना या विरोधात आहेत.
महापुरानंतर संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वडनेरे समिती नेमण्यातही आली होती. त्यांनी विविध ठिकाणांना भेटी दिल्या, लोकांशी चर्चा केली. त्यांनी कुरुंदवाड येथे सेंट्रल वॉटर कमिशनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात पूर लवकर न ओसरण्यामागे अलमट्टी धरण आणि त्याच्या वरच्या बाजूला कर्नाटकच्या हद्दीत अंकली-मांजरी पुलाचा भराव आणि हिप्परगी धरणाजवळील तांत्रिक अडचणी कारणीभूत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे धरण उंचीच्या वाढीवरून तालुक्यातील नेत्यांनी राजकारण न करता एकसंघ होऊन लढा उभा करण्याची गरज आहे.
इतर महत्वाच्या बातम्या