Kolhapur News : उद्धव ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांची कोल्हापूर जिल्ह्यात मुंबईच्या गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. पथकाने पहिल्यांदा हातकणंगले तालुक्यात चौकशी केल्यानंतर आता शिरोळ तालुक्यात चौकशी सुरु केली आहे. शिरोळ तालुक्यामध्ये कुरुंदवाडमध्ये प्रतिज्ञापत्राची तपासणी सुरू करण्यात आली. पडताळणी करत असताना ज्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळून येईल, त्यांची प्रत्यक्ष चौकशी पथकाकडून केली जात आहे. आतापर्यंत 225 जणांकडून जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईनंतर कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुखांनी काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचा दावा केला आहे.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे संघर्ष सुरु आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत. यामध्ये ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांवर आक्षेप घेण्यात आला आहे. राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये चौकशी सुरु आहे. या संदर्भात मुंबईतील निर्मलानगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन अधिकारी व दोन अंमलदारांच्या या पथकाने दीड हजारांवर प्रतिज्ञापत्रांची पडताळणी सुरू केली आहे. या पथकाकडूनही काल दिवसभरात हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात चौकशी करण्यात आली. प्रतिज्ञापत्रांची प्रत्यक्ष पडताळणी सुरु असल्याने कारवाई आणखी काही दिवस सुरु राहण्याची शक्यता आहे.
चार जिल्ह्यांमध्ये चौकशी
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथके कोल्हापूर, पालघर, अहमदनगर आणि नाशिकमध्ये पोहोचली आहेत. ठाकरे यांच्या समर्थनार्थ दिलेली सुमारे साडे 4 हजार प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाचा आहे. ठाकरे गटाच्या शपथपत्रांवरती शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांकडून लाखो शपथपत्र सादर झाली आहेत. परंतु, ठाकरे गटाची जवळपास साडेचार हजार प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा आरोपानंतर गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गटाने शिवसेना पक्षावर दावा केला आहे. शिवसेना पक्ष आपल्याकडे राहावा यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाचा प्रयत्न सुरू आहे. काही दिवसांपूर्वी वांद्रे येथे जवळपास 4600 च्या आसपास बनावट प्रतिज्ञापत्र तयार केले जात असल्याचे समोर आले होते.