Anamika Dakare Adobe : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अनामिका राजाराम डकरे या विद्यार्थीनीला ‘अॅडोबे’ या जगविख्यात कंपनीमध्ये तब्बल 60 लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर नोकरी मिळाली आहे. या यशाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते अनामिकाचा सन्मान करण्यात आला.


अनामिका डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. गेल्यावर्षी तृतीय  वर्षाचे शिक्षण घेत असतानाच अनामिकाला ‘अॅडोबे’कडून ‘टेक्निकल ऑफिसर’ या पदावर निवड केली होती. याच कंपनीने डिसेंबर 2021 मध्ये प्राॅडक्ट इंटर्न म्हणून 1 लाख रुपये विद्यावेतनावर तिची निवड केली होती. इंटर्नशिप कालावधी संपल्यानंतर अनामिकाला वार्षिक 60 लाख रुपयांच्या पॅकेजवर पूर्णवेळ नोकरीसाठी निवड केली आहे. 


अनामिकाचे वडील शिक्षक असून त्यांच्या नोकरीनिमित्त ते कोल्हापुरात स्थायिक आहेत. इंजिनिअर होणारी ती कुटुंबातील पहिलीच मुलगी आहे. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमधून पदविका पूर्ण केल्यानंतर तिने डी. वाय. अभियांत्रिकी महाविद्यालयात थेट दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश घेतला. निवड झाल्यानंतर अनामिका म्हणाली, सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द, परिश्रम व आई-वडील व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांचे पाठबळ व मार्गदर्शन यामुळे हे यश मिळवता आले. उत्तम नोकरी मिळाली असली तरी शिक्षण सुरूच ठेवणार आहे. आयटी क्षेत्रातील नवनवीन तंत्रे आत्मसात करून याच क्षेत्रात मोठे काम करण्याची ईच्छा आहे. 


अनामिकाच्या यशानंतर आमदार ऋतुराज पाटील यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, अनामिकाचं यश अत्यंत कौतुकास्पद आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत व खूप मोठ्या स्पर्धेतून तिनं हे यश मिळवले आहे. या यशामागे तिची व तिच्या कुटुंबियांची प्रचंड मोठी मेहनत आहे. हे यश संस्था व सर्व विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे.


कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी सांगितले की, महाविद्यालयात प्लेसमेन्टच्या दृष्टीने पहिल्यापासून चांगली तयारी करून घेतली जाते. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाकडून त्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. 


 


इतर महत्वाच्या बातम्या