Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यावर बंद अवस्थेत (स्क्रॅप) उभी असलेली वाहने हटवण्यात येणार आहेत. अतिक्रमण विभाग व संबंधित विभागीय कार्यालयामार्फत 12 डिसेंबरपासून उभ्या वाहनांवर कारवाई सुरु करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरात बऱ्याच ठिकाणी वाहने बंद अवस्थेत (स्क्रॅप) एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे उभी आहेत. ही वाहने रस्ते पुल, उडडाण पुल येथे अनाधिकृतपणे सोडून दिलेली आहेत. अशा बेवारस वाहनामुळे वाहतुकीस मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होऊन अपघातास निमंत्रण मिळत आहे. 


रस्त्यावर वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या अशा वाहनांवर कारवाई करण्याचा शासन निर्णय झाला आहे. बेवारस स्थितीत असलेल्या रस्त्यावरील वाहनांच्या मालकांनी वाहने सार्वजनिक ठिकाणी वर्षानुवर्षे बंद अवस्थेत उभी केलेली आहेत ती आपण स्वत:हून हटवून महानगरपालिकेस सहकार्य करावे व जप्तीचा कटू प्रसंग टाळावा असे आवाहन अतिक्रमण विभागाच्यामार्फत करण्यात आले आहे.


Kolhapur Municipal Corporation : नगररचना विभागाकडील तक्रारी आयुक्त कार्यालयात स्वीकारणार


दरम्यान, नगररचना विभागाकडील कामांबाबत व तक्रारींबाबत नागरीकांना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे नगररचना कार्यालयात दर गुरुवारी दुपारी 3.30 ते 5.30 या कालावधीत भेटतात. शासन परिपत्रकानुसार शहरातील नागरिकांना भेटणेसाठी महापालिकेने बुधवार व गुरुवार असे दोन दिवशी निश्चित केले आहेत. महापालिका प्रशासक तथा आयुक्त नागरीकांच्या तक्रारींची, कामाची दखल घेऊन त्यांचे समाधान करण्याच्या दृष्टीने बुधवारी आयुक्त कार्यालयात व गुरुवारी नगररचना कार्यालयात भेटतात. परंतु काही अरिहार्य कारणामुळे 8 व 15 डिसेंबर रोजी प्रशासक नगररचना कार्यालयाऐवजी आयुक्त कार्यालयात नागरिकांना भेटणार आहेत. तरी नागरीकांनी या दोन्ही दिवशी नगरचना कार्यालयात न जाता आयुक्त कार्यालयात भेटण्यासाठी यावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


ठेकेदारांच्या मनमानीला कोल्हापूर मनपा आयुक्तांकडून चाप


दरम्यान, कोल्हापूर शहरातील सुरु असलेल्या कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत ठेकेदारांवर मनपा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे (kadambari balkawade) यांनी दंडाची कारवाई करत दणका दिला आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत काम चालू केले नसल्याने ठेकेदार शैलेश भोसलेला 24 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. महापालिकेकडील 119 कामासाठी 39 ठेकेदारांना विहित मुदतीत काम चालू केले नसलेने त्यांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दोन आरोग्य निरीक्षकांवरही दैनंदिन काम जबाबदारीने न केल्याने दंडाची कारवाई करण्यात आली आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या