Kolhapur Crime : कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यामध्ये शुल्लक कारणांवरून आत्महत्या करण्याच्या (kolhapur Crime) घटना सुरुच आहे. करवीर तालुक्यातील कंदलगावमध्ये घरातील लोकांनी मोबाईलवर कमी बोलण्यास सांगितल्यानंतर राग आल्याने अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याने आईला चांगलाच मानसिक धक्का बसला आहे. बुधवारी ही घटना उघडकीस आली. या घटनेची गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
दरम्यान, मुलीच्या आत्महत्येनंतर सीपीआर परिसरात नातेवाईकांनी गोंधळ घातला. मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने मित्रावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. मृत मुलीच्या पश्चात आई, वडिल आणि भाऊ असा परिवार आहे. मृत अल्पवयीन मुलगी रविवारी घरातील लोक रागावल्यानंतर घरातून निघून गेली होती. यानंतर अपहरणाची तक्रार नोंद झाली होती. मुलीचा शोध घेत असतानाच वाडीची विहिर म्हणून प्रचलित असलेल्या विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मुलीच्या आत्महत्येनंतर आई वडिलांनी आक्रोश केला. प्रचंड मानसिक धक्का बसल्याने मृत मुलीची आई बेशुद्ध झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Kolhapur Crime : आत्महत्यांचे सत्र सुरुच
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तरुणींच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. करवीर तालुक्यातील बीडशेडमध्ये वयाची पंचवीशी सुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक मुलीने आत्महत्या केली होती. यापूर्वी त्याच तरुणीच्या मोठ्या बहिणीने सुद्धा दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यामुळे दुर्दैवी आई वडिलांना मुलीच्या अशा निर्णयाने निराधार होण्याची वेळ आली आहे. सानिका सर्जेराव सातपुते (वय 24) या तरुणीने राहत्या घरीच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली होती.
मामा वारल्यानंतर नैराश्यात भाचीने केला आयुष्याचा शेवट
पन्हाळा तालुक्यातील (panhala) कोडोली साखरवाडीत मामाच्या मृत्यूच्या नैराश्यातून भाचीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. श्रद्धा धर्मेंद्र कांबळे (वय 24) असे त्या तरुणीचे नाव आहे. धर्मेंद्र कांबळे यांना श्रद्धा एकूलती एक मुलगी होती. तिने मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करून पुण्यात एका कंपनीमध्ये कार्यरत होती. मामा संचित कांबळे (उदगाव, ता. शिरोळ) यांच्या निधनानंतर श्रद्धा नैराश्यात गेली होती. या नैराश्यात असतानाच श्रद्धाने दुसऱ्या मजल्यावरील पंख्याच्या हुकाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या