Rajarshi Shahu Maharaj : लोकराजा लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या (Rajarshi Shahu Maharaj) समाधीस्थळाचे सुशोभिकरणासह अन्य कामे पूर्ण करण्याासाठी 9.40 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय विभागाने जारी केल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. 


निधीस मान्यता मिळाल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले. सामाजिक न्याय विभागाकडून 9 कोटी 40 लाख 56 हजार 108 अंदाजपत्रकास शासनमान्यता मिळाली. 


सुशोभीकरणासह अन्य कामांसाठी निधीची मान्यता मिळाल्याने काम जलदगतीने पूर्ण होणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. शाहू महाराजांचे स्मृतीशताब्दी वर्ष कृतज्ञता पर्व म्हणून महाविकास आघाडी सरकारकडून आयोजित करण्यात आले होते. यासाठी 5 कोटींचा निधी देण्यात आला होता. महाराजांच्या स्मृती शताब्दीच्या पार्श्वभूमीवर नूतनीकरण, सुशोभीकरण कामे हाती घेण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली होती. 


दरम्यान, मिळालेल्या निधीतून दुसऱ्या टप्प्यामध्ये परिसरातील 7 समाधींचे दुरुस्तीसह नुतनीकरण, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हाॅल नुतनीकरण, हाॅलमध्ये  आर्ट गॅलरी, तसेच डाॅक्युमेंटरी दाखवण्यासाठी व्यवस्था, दलितमित्र दादासाहेब शिर्के उद्यान संरक्षक भिंत,  पार्किंग सुविधा, शौचालय बांधणी आदी कामे करण्यात येतील. 


राजर्षी शाहू महाराजांची जयंती २६ जून रोजी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली होती. त्यांच्या कार्यास शोभून दिसेल, असे काम त्यांच्या समाधी स्थळी करून दाखवू, अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या